मुंबईच्या दहिसर मध्ये सराफाच्या दुकानात दरोडा, गोळीबारात मालकाचा मृत्यु.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई :- मुंबईच्या दहिसर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सराफाच्या दुकानात चोरट्यानी दरोडा टाकुन सोनाराच्या दुकान मालकाची हत्या केल्याचा घटनेने मुंबईतील दहिसर भागात एकच खळबळ उडाली आहे. दहिसर येथील ओम साईराज ज्वेलर्सचे मालक शैलेंद्र रमाकांत पांडेय वय 45 वर्ष यांचा दरोडेखोरानी गोळीबार करत खून केला आहे. खून केल्या नंतर तिघे दरोडेखोर सराफाचे दुकान लुटून पसार झाले. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दहिसर पूर्व येथील रावळपाडा परिसरात गावडे नगर भागात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. बंदुकीचा धाक दाखवून तिघे दरोडेखोर ओम साईराज ज्वेलर्समध्ये घुसले. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता दरोडेखोरानी त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज
हत्येनंतर दुकानात लूट करुन तिन्ही दरोडेखोर फरार झाले. दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
ओम साईराज ज्वेलर्समध्ये दरोडा टाकणारे तिन्ही दरोडेखोर एकाच मोटरसायकल वरुन आले होते. दुकानातील सोनं लुटल्यानंतर ते पसार झाले. मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.