विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230
चंद्रपूर, दि. 1 : नागरिकांच्या निरोगी जीवनासाठी खेळाचे महत्त्व तथा क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत कार्यालय व खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल चंद्रपूर येथे 29 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत क्रीडा विषयक उपक्रम घेण्यात आले.
29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता क्रीडा विषयक जनजागृतीसाठी जेष्ठ खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आली. लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, क्रीडा शिक्षक, खेळाडू यात सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात खेळाडूंना मार्गदर्शन, परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आले. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला. नंतर टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी 5.30 वाजता खेळाडूंची रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली.
30 ऑगस्ट रोजी धावपटूंची मेरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांमधून भूषण अस्वले प्रथम, योगेश वासाडे द्वितीय व आकाश राठोड यांनी तृतीय कमांक प्राप्त केले. तर मुलींमध्ये कामिनी निसाद प्रथम, श्रेया येवले द्वितीय, तर अफसाना करिमशाह हिने तृतीय क्रमांक पटकाविला. जेष्ठ नागरिक व खेळाडुंकडून योग द्वारा मानसिक शांतीचे पाठ देण्यात आले. सायंकाळी जलतरण स्पर्धा घेण्यात आली. यात 200 मी. फ्री स्टाईल प्रकारात मुलीमध्ये मुदूल टोंगे प्रथम व पारुल पिटुंरकर हिने द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये स्वचेत चेतन कंदिकुरवार याने प्रथम आणि श्रेयश नितीन टोंगे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
31 ऑगस्ट रोजी नागरिकांमध्ये सायकलींगचे महत्त्व वाढविण्याकरीता सायकल ऑन संडे स्पर्धा घेण्यात आली. दुपारी वरोरा येथे मल्लखांब स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय डेव्हलपमेंट अॅड रिसर्च एज्युकेशन सोसायटीकडून क्रीडा पर्व घेण्यात आला. या अंतर्गत हॉकी स्पर्धा, बाइक रॅली, रस्साखेच स्पर्धा, नेटबॉल स्पर्धा पार पडल्या. तसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकूल, सर्व क्रीडा संघटना व सर्व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी व हॅडबाल खेळाडू कुंदन नायडू, मेरा युवा भारत कार्यालयाचे श्री. कुरेशी, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदिप उईके, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, नंदू अवारे, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्रभूदास रासेकर, अशोक कांबळे, विलास गजबे, श्री. कन्नाके, श्री. शेख, मनोज आखाडे यांच्यासह मेरा युवा भारत कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सर्व क्रीडा मार्गदर्शक, बार्टी, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.