रायगड जिल्ह्यात गौरीईचे पारंपरिक पद्धतीने आगमन…….
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- श्री गणरायाच्या आगमनानंतर पाच दिवसाने रायगड जिल्ह्यामध्ये “आली सोन्याच्या पावलांनी.., गौराई आली माणिक-मोतींच्या पावलांनी”.. असे गीत गात लाडक्या गौराईचे सवाद्य आगमन झाले . असून सोमवारी गौराईची पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करण्यात येणार आहे. आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजच्या तंत्रज्ञानच्या युगात ग्रामीण भागात गौराईचे पारंपारिक पद्धतीने महिलांनी साज शृंगार करून स्वागत करण्याची पद्धत कायम आहे.
यावेळी महिलांनी पारंपरिक गीते गात गौराईचे स्वागत केले, सुहासीनींनी वस्त्रालंकार परिधान करून पारंपारीक गाणी गात, झिम्मा फुगडीचा फेर , बैठी फुगडी चा फेर धरला .यावेळी गौरीला सुवर्णालंकार परिधान करून सजविण्यात आले होते. तर यावेळी तेरड्याच्या डहाळ्यां सर्वांना आकर्षित करीत होते. गौराईचे आगमन झाल्यानंतर संध्याकाळी महिलांनी बाजारपेठेमध्ये दुसऱ्या दिवशीच्या पूजेचे साहित्य आणि गौराईला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्यामध्ये आवश्यक असणाऱ्या भाजीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.
२१ व्या शतकात अनेक बदल घडवून येत आहेत, आज अनेक ठिकाणी श्री गणेशाची, सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी पुजारी मिळत नसले तरी तंत्रज्ञानचा वापर करत युट्युब द्वारे पूजा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे देवासाठी लागणारा प्रसाद ही तयार मिळत असल्याने अनेक जण खरेदी करीत आहेत. मात्र आजही कोकणातील ग्रामीण भागात संस्कृती टिकवत सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत यातून परंपरा व सणाचे महत्व टिकून राहिले आहे. त्यातच या वर्षी ओवसा आल्याने महिला वर्गात आनंदी तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पहिला ओवसा करणाऱ्या महिलांची लगबग दिसून येत आहे. बांबू पासून तयार करण्यात येणारे सूप व पूजेचे साहित्य सह नवनवीन वस्त्रालंकाराला अधिक मागणी असल्याचे दिसून येते.
कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवातील पारंपारिक गौरीपूजन व पारंपारिक ओवसा सण प्रसिद्ध आहे. गौरीपूजनाच्या अनेक पारंपारिक प्रथा व विधी कोकणात प्रचलित आहेत. गौरी-गणपती सणासाठी मुंबई, पुण्यातून अनेक चाकरमानी आपापल्या गावी येतात. कोकणात गणपती उत्सव जल्लोष आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.
गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता, आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते.
वाजत-गाजत गौराईला घरी सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळेला पारंपरिक पद्धतीने घरी आणण्यात आले . गौरीला साडी नेसवून तिला नटवले गेले. गौरीची स्थापना व इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून करण्यात आली काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पूजा केली जाते. गणपतीच्या आगमना नंतर गौराई देवीचे सर्वत्र आगमन झाल्याने शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण झाले आहे.