जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेजला मिळणार ‘स्वच्छता हिरवे पान मानांकन’
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : हॉटेल, लॉज, होमस्टेज, धर्मशाळांमध्ये पर्यटकांना, नागरिकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सेवा मिळण्यासाठी स्वच्छता हिरवे पान मानांकन (ग्रीन लीफ रेटिंग) प्रणाली रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित आस्थापनांना मानांकन दिले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यातील सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील पर्यटक अनुकुल स्वच्छता सुविधांचे मुल्यमापन करणे (ग्रीन लीफ रेटिंग इन हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटीज) प्रस्तावित आहे. त्यामुळे सेवाक्षेत्रातील स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मुल्यांकनामुळे अशा व्यवसायिक आस्थापनांमध्ये विधायक स्पर्धेचे वातावरण निर्माण होऊन त्याचा पर्यटनवृद्धीत उपयोग होऊन जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे.
हिरवे पान मानांकनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. उपाध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिवपदी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर सदस्य म्हणून पर्यटन विभाग किंवा एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने पर्यटन किंवा हॉटेल उद्योगातील प्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश असेल. तर तर तालुकास्तर समिती उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदावर गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता, स्वच्छ भारत मिशनचे विस्तार अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
……………………
पाणवठ्यामधील प्रदूषण रोखून पर्यावरण स्वच्छ ठेवणे हा स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग प्रणालीचा उद्देश आहे. हिरवे पान मानांकन प्रणाली २०० गुणांची आहे. घनकचरा व्यवस्थापन ८० गुण, मैला गाळ व्यवस्थापन ८० गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ४० गुण असणार आहेत.
…………………….
हिरवे पान मानांकन प्रणाली उपक्रमाचा पर्यटन वृद्धीस उपयोग होऊन जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स ,लॉज होम स्टेज, धर्मशाळा यांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यटन वृद्धीच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.
: डॉ.भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
……………………..