महाराष्ट्र: सामाजिक न्याय खात्याचे तब्बल 875 कोटी रुपये सरकारने पळवले.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
✒9766445348📲
नागपुर:- नागपूर येथील कामठी येथे उभारण्यात येणा-या सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ऑक्टोबरमध्ये सामाजिक न्याय खात्याचे तब्बल 875 कोटी रुपये पळवले आहेत. त्याविरोधात आंबेडकरी संग्राम या संघटनेने महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्या अभियानाला रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेचा सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. आपण स्वतः त्या अभियानात चैत्यभूमीवर जाऊन राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे सामाजिक न्याय खात्याचा दलित विकासाचा निधी पळवण्याचा निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजातून जनमताचा मोठा रेटा उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
आंध्रच्या धर्तीवर कायदा करा
हे स्वाक्षरी अभियान महापरिनिर्वाण दिनानंतर दलित वस्त्यांमध्येही राबवण्यात येणार आहे. 875 कोटी सामाजिक न्याय खात्याला परत करावेत. तसेच त्या खात्याकडील दलित विकासाचा निधी हा त्याच कामासाठी वापरणे बंधनकारक करण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर कायंदा करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी संग्रामने ऐरणीवर आणली आहे.
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी महापरिनिर्वाण दिनी
अभिवादनासाठी चैत्यभूमीवर जाण्याचा जाहीर केलेला निर्धार म्हणजे बौद्ध समाजाच्या जनभावनेचाच आविष्कार आहे. त्यांची घोषणा अपेक्षितच असून स्वागतार्ह आणि समर्थनीय आहे. ‘ कापलो गेलो तरी, तोडले नाही तुला… जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला….’ असे अतूट नाते असलेली दलित जनता आपल्या मुक्तीदात्याशी फार काळ ताटातूट कशी सहन करू शकेल?, असा सवाल आंबेडकरी संग्रामचे सरचिटणीस दिवाकर शेजवळ यांनी केला आहे.