‘त्या’ ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा सेवेत कायम करणार! कोविड काळात सेवा दिलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकाना कायमस्वरुपी रुजू करणार, आरोग्य विभागाचा निर्णय
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
मुंबई,1 डिसेंबर: कोविडकाळात कंत्राटी स्वरूपात विविध विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना कायमस्वरुपी म्हणून कामावर रुजू करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यामुळे कोविड काळात निरंतर रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आलेल्या या आरोग्यसेविकांचे 11 महिन्यांचे कंत्राट होते. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचे कंत्राट पुन्हा कायम करण्यात आले नाही. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेल्या आरोग्य सेविकांनी आपणास सेवेत कायमस्वरूपी म्हणून दाखल करून घेण्याची मागणी केली होती. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने आरोग्य सेविकांची मागणी लक्षात घेऊन ५९७ आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी ‘शासनसेवेत घेण्याचा निर्णय घेतला. या आरोग्य सेविकांना उप संचालक, आरोग्य सेवा परिमंडळे यांनी त्यांचे मंडळातील एनयूएचएम, आरबीएसके, आदिवासी,बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पदावर नेमणुका द्यावात असे यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. आरोग्य सेविकांना नेमणुका देताना व त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी. त्यानुसार समुपदेशाने रिक्त पदावर समायोजन करावे. एकाच दिवशी सेवेत रूजू झालेल्या आरोग्य सेविकांची सेवा ज्येष्ठता ठरवताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे शेवटच्या वर्षाचे गुण बघून जास्त गुण असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे.
■राज्याचा निर्णय
समायोजनाची प्रक्रिया सुट १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यस्तरावर सादर करावा. विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक यांनी जिल्हास्तरावरून प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करून लवकरात लवकर प्रक्रिया करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी राज्य स्तरावर सादर करावा, असेही या शासननिर्णयात म्हटले आहे.