चंद्रपुरातील ताडोबात दोन वाघांचा मृत्यू! 7 महिन्याच्या शावक व 15 वर्षीय वाघिणीचा समावेश 

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,1 डिसेंबर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकापाठोपाठ एक अश्या दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 डिसेंबरला शिवणी वनपरिक्षेत्रामधील वासेरा नियतक्षेत्रालगतच्या गट क्रमांक 185 मध्ये एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली. तर, 1 डिसेंबरला मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी येथील कक्ष क्रमांक 189 मध्ये वाघाचे शावक (मादी) मृतावस्थेत आढळून आले. ताडोबातील बफर विभागातल्या शिवणी वनपरिक्षेत्रामधील वासेरा नियतक्षेत्रालगत असलेल्या महसूल विभागातील गट क्रमांक 185 दरम्यान बिट वनरक्षक (वासेरा) व मदतनीस 30 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास गस्त घालीत असताना त्यांना वाघिण (टी-75) ही मृतावस्थेत आढळून आली. याबाबत माहिती मिळताच प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक व पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृत वाघिणीचे वय अंदाजे 15 वर्षे असून, तिचा मृत्यू वृध्दापकाळाने नैसर्गिकरित्या झाला असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच मृत वाघिणीचे अंतर्गत अवयव व कातडी संपूर्णत: कुजलेल्या स्थितीत असून, दात व नखे शाबूत स्थितीत होते. हा शिकार किंवा घातापाताचा प्रकार नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे वनविभागाने कळविले आहे. 1 नोव्हेंबरला कुशाग्र पाठक, डॉ. कुंदन पोडचलवार, सिंदेवाही पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरपाम, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी तथा इको-प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, चंद्रपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर यांनी घटनास्थळी भेट देवून मृत वाघिणीची पाहणी तसेच वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर विच्छेदन करुन मृतदेहाचे दहन करण्यात आले.

घटनास्थळावर श्वान पथकाद्वारे तपास व इतर आवश्यक कार्यवाही, पाठक यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.तर, दुसर्‍या घटनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी येथील कक्ष क्रमांक 189 मध्ये अंदाजे 6-7 महिन्याचे वाघाचे शावक (मादी) 1 नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आले. हे शावक टी-60 वाघिणीचे असून, घटनेबाबत कळताच सहायक वनसंरक्षक बापू येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (मोहर्ली) संतोष थिपे, डॉ. कुंदन पोडचलवार व डॉ. संजय बावणे, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर यांनी घटनास्थळी भेट देवून मृत शावकाची (मादी) पाहणी केली व चंद्रपूर येथील ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे आणले. त्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करुन आवश्यक नमूने तपासणी करिता घेण्यात आले. या शावकाचा मृत्यू इतर मोठ्या नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीवरुन दिसते असे सांगण्यात आले. पुढील कार्यवाही कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनात संतोष थिपे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here