वर्धा पोलीस शिपाईचा भरधाव कारने एकास चिरडले, जागेवर मृत्यु.

मुकेश चौधरी प्रतीनीधी
वर्धा :- शहर पोलीस ठाण्यात कार्यारत असलेल्या पोलीस शिपाई सचिन दुर्गाप्रसाद दीक्षित वय 30 वर्ष रा. रामनगर याने निष्काळजीपणे कार चालवून ‘मॉर्निंगवॉक’ साठी घराबाहेर पडलेल्या एकास जबर धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालयासमोर घडली. रौनक सुबोध सबाणे वय 35 वर्ष, रा. सबाने लेआऊट, असे मृताचे नाव आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रौनक सुबोध सबाणे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. ते पायी-पायी बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालया जवळून जात होते. पोलीस शिपाई सचिन दुर्गाप्रसाद दीक्षित एमएच 06 बीई 4711 क्रमांकाची भरधाव असलेल्या कारने त्यांना धडक दिली. अपघात होताच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर चढले. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे 35 वर्ष, रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

बॅचलर रोडवर झालेल्या अपघाताची वार्ता वर्धा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांची गर्दी बाजूला सारून सुरूवातीला पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here