पोलिओ डोस देताना कुपीचे प्लॅस्टीक नोजल बाळाच्या पोटात गेले, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार..

प्राथमिक माहितीनुसार हा सगळा प्रकार पोलिओचा डोस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाला असल्याचं कळालं आहे. एक महिला तिच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी रविवारी भाळवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली होती. बाळाला लस देत असताना आरोग्य कर्मचाऱ्याच्या हातातून कुपीचे बोंडूक निसटलं आणि बाळाच्या तोंडात पडलं. बाळाने ते लसीसोबत गिळून टाकलं. हा प्रकार पाहिल्यामुळे बाळाच्या आईने तिथल्या लोकांना सावध केलं. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात बाळाची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकाराबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असून त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.