अलिबाग समुद्र किनारा ते कुलाबा किल्ल्यापर्यंत रोपवे

अलिबाग समुद्र किनारा ते कुलाबा किल्ल्यापर्यंत रोपवे

श्रीक्षेत्र कनकेश्वर देवस्थान पर्यंत होणार रोपवे; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-अलिबाग जवळच्या श्रीक्षेत्र कनकेश्वर देवस्थानच्या दर्शनाला जाण्यासाठीचा मार्ग लवकरच सोपा होणार आहे. राज्यातील एकूण ४५ देवस्थानावर जाण्यासाठी रोप-वे उभारण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर आणि अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला या मार्गाचाही समावेश आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राज्य मार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजने अंतर्गत रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. अलिबागकरासह संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या मापगाव येथील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वृद्ध भक्तांना दर्शनासाठी जाता येत नाही. तरुण मंडळी देखील पायरी मार्गाने जाणे टाळतात. त्यामुळेच या ठिकाणी रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक गणपतीचे मंदिर म्हणजेच गणेश पंचायतन हे अलिबाग करांचे आराध्य दैवत मानले जाते. मात्र हे मंदिर अरबीसमुद्रात असणाऱ्या कुलाबा किल्ल्यात स्थित आहे. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ज्यावेळी ओहटी असेल त्याच वेळी जाता येते. इतर वेळी किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक कोळी बांधवांच्या बोटी उपलब्ध असतात. मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे किनाऱ्यापासून किल्ल्यात जाण्यासाठी रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. कनकेश्वर येथील रोपवेची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची तर समुद्रकिनाऱ्यावरील रोपवेची जबाबदारी अलिबाग नगर परिषदेची आहे. रोपवेची उभारणी करताना विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे. जिल्ह्यातील किल्ले रायगड, माथेरान, घारापुरी एलिफंटा लेणी येथेही रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. सरकारने दोन्ही ठिकाणी रोपवे उपलब्ध करून दिल्यास अलिबाग मध्ये पर्यटन वाढ होण्यास मोठी संधी आहे. सध्या पर्यटक दुरूनच या किल्ल्याचे दर्शन घेतात. मापगावच्या डोंगरावर असलेले श्री क्षेत्र कनकेश्वर हे ठिकाण पर्यटकांसाठी अपरिचित आहे. परंतु रोपवे सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटनाचे नवे दालन खुले होणार आहे.

कनकेश्वर रोप-वेचा प्रस्ताव खूप आधीच पाठवला आहे. वर्षभर देवस्थानाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु तेथे पोहोचणे वयोवृद्ध लहान मुलांना शक्य होत नाही. रोपवेमुळे भाविकांना दिलासा मिळेल असाच प्रस्ताव कुलाबा किल्ल्याचे ही असेल.

-आमदार महेंद्र दळवी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ