अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व कंत्राटदाराच्या लेटलतीफशाहीमुळे आष्टी आलापल्ली मार्गावर नागरिकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
आष्टी:- गडचिरोली ते सिरोंचा या 353 या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरवात झाली. मात्र आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ते वनविभागाच्या तपासणी नाक्यापर्यंतच्या या दीड किलोमीटर अंतरावर रस्ता खोदून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी ओलांडला तरी काम जैसे थे स्थितीत आहे. या मार्गावर रोज हजारो वाहने येजा करतात हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अवजड वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात ये जा करतात. मात्र रस्ता खोदून त्यावर गिट्टीचा एक थर टाकून असल्यामुळे दुचाकी, सायकल आणि पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या दीड किलोमीटरच्या अंतरावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर या मार्गावर ग्रामीण रुग्णालय, बँक, शाळा, महाविद्यालय असल्याने या मार्गावर नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. अर्धवट काम झालेल्या या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येजा करणाऱ्या वाहनांचा वेगही खूप मोठया प्रमाणात असल्यामुळे कोणत्याही क्षणी या रस्त्यावर अपघातास आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. सोबतच या मार्गावर वस्ती असणाऱ्या नागरिकांना धुळीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.असे असले तरी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. आणि सदर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची लेटलतीफशाही सुरू आहे. याचा फटका मात्र या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. या कामाची गती अशीच मंद राहिल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.