कॅन्सर ते पीएच.डी.: किनवटच्या आदिवासी भागातील युवकाची धैर्यगाथा…!!

46

कॅन्सर ते पीएच.डी., किनवटच्या आदिवासी भागातील युवकाची धैर्यगाथा…!!

किनवट: माझ्या नावापुढे एक दिवस ‘डॉ.’ लागेल,” ही वाक्यं उच्चारली तेव्हा वय होतं केवळ १८ वर्षं आणि समोरचं वास्तव होतं स्टेज IV कोलन कॅन्सरचं. पण या शब्दांमागे असलेल्या निशांत श्याम चव्हाण यांच्या मनातील जिद्द आणि स्वप्नं आज प्रत्यक्षात उतरली आहेत.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येतील आदिवासी भागातून आलेल्या डॉ. चव्हाण यांनी केवळ कॅन्सरवर मात केली नाही, तर अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवून सध्या पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

२०१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्यांना कोलन कॅन्सरचे निदान झाले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टरांनी त्यांना केवळ तीन महिन्यांचे आयुष्य दिले होते. मात्र, निशांत यांनी हार मानली नाही. तब्बल ८ कीमोथेरपी आणि ५ मोठ्या शस्त्रक्रिया यांचा सामना करत त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले.

. या कठीण प्रवासात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि एम.ए. अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर SET आणि NET या महत्त्वाच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या – तेही उपचार सुरू असतानाच.

अलीकडेच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून “पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील पीक पद्धतीतील बदलांचे तुलनात्मक अध्ययन (२०१०-२०२०)” या विषयावर पीएच.डी. मिळवली. हे संशोधन प्रा. डॉ. पी. आर. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. चव्हाण म्हणतात, “या प्रवासात मी एकटा नव्हतो. माझ्या पाठीशी उभे राहिलेले डॉक्टर, शिक्षक आणि कुटुंब हे माझे खरे आधारस्तंभ आहेत.”