आरसीएफ आदिवासी कबड्डी स्पर्धेत गावदेवी कातळा संघाने कामगार स्मृती चषक जिंकला

आरसीएफ आदिवासी कबड्डी स्पर्धेत गावदेवी कातळा संघाने कामगार स्मृती चषक जिंकला

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) लिमिटेड, थळ यांच्यातर्फे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेत जय गावदेवी कातळा – रोहा संघाने विजेतेपद मिळवून कामगार स्मृती चषक पटकावला. गौळावाडी-पेण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
जय हनुमान वाघोडे संघाने तृतीय तर जय हनुमान मोरोंडे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. अरविंद हंबीर ( कातळा) यास स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक मितेश दोरे (गौळावाडी ) याला तर. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक राम मेंगाळ (वाघोडे) याला देण्यात आले.
कामगार दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. १) आरसीएफ वसाहत, कुरुळ येथील क्रीडासंकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यात ६४ आदिवासी संघ सहभागी झाले होते.

जय गावदेवी कातळा – रोहा आणि गौळावाडी-पेण या दोन संघात झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या हा सामना कातळा संघाने ३३-३० असा जिंकून विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत जय गावदेवी कातळा संघाने जय हनुमान वाघोडे संघाचा १७-९ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत गौळावाडी पेण संघाने जय हनुमान मोरोंडे संघावर १७ – १६ अशी मात केली.

स्पर्धेत विजेत्या संघास रोख रुपये २५०००/- व चषक , उपविजेत्या संघास रोख रुपये १५०००/- व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमाक मिळवणाऱ्या संघास रोख रुपये १००००/ – व चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांच्यासाठी रोख रक्कम व चषक अशी बक्षिसे देण्यात आली.

आरसीएफ थाळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. महाव्यवस्थापक संजीव हरळीकर , महाव्यवस्थापक
सुधीर कोळी , अभय कालबाडे , व्ही .मगेश
उप महाव्यवस्थापक विनायक पाटील , वरिष्ठ प्रबंधक प्रशांत म्हात्रे , सर्व संघटनांचे प्रतिनिधी , मानव संसाधनचे अधिकारी , प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ राकेश कवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.