रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार?
अडीच-अडीच वर्षांचा कालावधी पदरी पडणार?
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महायुतीतील कोणत्या राजकीय पक्षाच्या झोळीत पडणार असा असणारा संभ्रम लवकरच दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने बाजी मारल्याचे राजकीय सूत्रांच्या महितीमुळे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय डावपेचासमोर शिंदे गटाचे नेते अपयशी ठरल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीच्या पक्ष श्रेष्ठींनी सोडविला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रीपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पहिले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असेल तर नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीत रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रिपद सोपवले जाणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटण्याचे संकेत मिळाले आहेत. कारण महाराष्ट्रदिनी रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले. त्यामुळे हा प्रश्न सुटल्याचे दिसते.राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या शासकीय ध्वजवंदनासाठी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, रायगडसाठी शिंदेंचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत. ध्वजवंदन करण्याची संधी दिली म्हणजे पालकमंत्रिपद दिले असे होत नाही असे म्हणत नाराजी व्यक्त करणार्या नेत्यांची तोंडे आता बंद होणार आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागते यांची चर्चा सुरु असताना आदिती तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. नंतर पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नेमण्यात आले होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. आदिती तटकरे यांनाच पुन्हा पालकमंत्री करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोर लावला जात आहे, तर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे सेना आग्रही आहे.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तटकरे नको असा रेटा अनेकदा लावला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक पक्ष नसतानाही तटकरेंच्या पालकमंत्री पदावर रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी जाहीर केली असल्याचे सर्वश्रुत आहे. फरक इतकाच तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि त्यावेळी शिवसेना एकत्रित होती. त्यानंतर शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि शिंदे शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली आणि शिंदे गटाला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे स्वप्न पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजप शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सामील झाला आणि शिंदे गटाचे पालकमंत्रिपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या कुठल्याही आमदाराला मंत्रिपदाची बोलावणं आला नाही. मात्र, अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीचाकळस पाहावयास मिळाला. त्यानंतर भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यामुळे आता पालकमंत्रिपदाचामार्ग सुकर झाला असे शिंदे गटाच्या रायगड जिल्ह्यातील नेत्यांना वाटले. मात्र तटकरेंच्या असणार्या गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या राजकीय फिल्डिंगमुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात घालणे शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अजूनतरी जमले नाही. पालकमंत्रिपद तटकरे कुटुंबाकडे गेले तर राजकीय पलटवार करण्याच्या तयारीत रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार आहेत असे अनेकदा त्यांनी आपल्या भाषणांमधून बोलून दाखवले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला गेले होते . त्यामुळे अमित शहा यांच्या या दौर्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. अमित शाह येऊन गेल्यानंतर आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या तिढा वरिष्ठांनी सोडविलाआहे. यामध्ये अडीच आधीचवर्षे पालकमंत्री पद भूषविण्याचा फार्म्युला ठरविण्यात आला आहे. यामध्ये पालकमंत्रिपदाचा पहिला मान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना तर नंतरची अडीच वर्षे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना देण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.