Home latest News मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका लवकरच पुन्हा सुरू होणार…

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका लवकरच पुन्हा सुरू होणार…

89
Mumbai thane toll news

संजय पंडित

दि.२,कळवा(ठाणे) : मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम आता जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना मात्र टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कळव्या लगतच्या खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने ३४ पदरी मार्गिकेवर टोलनाका उभारण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. त्यामुळे वेगवान प्रवासासोबतच आता प्रवाशांच्या खिशाला देखील कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून आणि गुजरात येथून भिवंडी किंवा नाशिकच्या दिशेने वाहतुक करतात. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग देखील मुंबई नाशिक महामार्गाला भिवंडी येथील आमणे भागातून जोडतो. त्यामुळे समृद्धी महामार्गाची वाहने मुंबईत वाहतुक करण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गानेच प्रवास करतात. तसेच कल्याण, भिवंडी भागातील हजारो हलकी वाहने याच महामार्गाने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई भागात वाहतुक करतात. या मार्गावर पूर्वी खारेगाव टोलनाका होता.

१९९८ या वर्षी हा टोलनाका सुरु झाला होता. टोलवसूली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. २०१७ मध्ये हा टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण, भिवंडी, नाशिक, उरण जेएनपीए येथील हजारो हलकी, जड-अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसूली बंद होऊन अवघे ९ वर्ष पूर्ण होत असतानाच, माजिवडा-वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसूली केली जाणार आहे.

खारेगाव नव्या पूलाच्या उभारणीनंतर आता खारेगाव टोलनाका उभारणीस सुरुवात झाली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ या मार्गाची १५ वर्ष देखभाल दुरुस्ती करणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोलवसूली करणार आहे. ठाणे खाडी किनारा प्रकल्प (कोस्टल रोड) हा देखील या मार्गाला जोडला जाणार असून या अवजड वाहनांनाही टोलचा भार सहन करावा लागणार आहे. ३४ पदरी मार्गिकेवर हा टोलनाका उभा असेल.

दरम्यान माजिवडा ते वडपे हा २३.८० किमी लांबीचा प्रकल्प असून २१.३१ किमी पर्यंत म्हणजेच, ९० टक्के प्रकल्प पूर्ण झाला आहे. यातील साकेत पूल आणि खारेगाव खाडी पूल हे महत्त्वाचे टप्पे सुरु झाले आहेत. वडपे उड्डाणपूल येत्या आठवडा भरात सुरु होण्याची शक्यता आहे. येवई, वालशिंद, सोनाळे, सरवली पिंपळास येथील भुयारी मार्ग पूर्ण झाले आहेत. तर रेल्वे पूलाचे काम ७१ टक्के पूर्ण झाले आहे. चौकट याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोलवसूली संदर्भातील निविदा काढल्या जातील असे त्यांनी सांगितले.