बीआरएस पक्षाची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू…
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो:९९२२५४६२९५
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष के सी राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून सीमोल्लंघन केले. के सी राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या पक्षाची बैठक बोलवली होती या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समितीचे २८३ आमदार खासदार व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत के सी आर यांनी आपला पक्ष राष्ट्रीय राजकाणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली इतकेच नाही तर त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरणही केले.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या त्यांच्या घोषणेचे उपस्थित सर्व आमदार खासदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले होते विशेष म्हणजे के सी आर यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणाची सुरवात महाराष्ट्रातून केली आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी लढा देणाऱ्या के सी आर यांच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर पक्ष विस्ताराची सुरवात त्यांनी महाराष्ट्रातून केली असून त्यादृष्टीने या पक्षाकडून ते महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार आहेत. महाराष्ट्रातील पाळेमुळे घट्ट करण्यासाठी बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पक्ष नोंदणी अभियान सुरू करणार आहे. बीआरएस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांकरिता दोन दिवसांचे प्रशिक्षण देखील आयोजित केले होते आणि त्या प्रशिक्षण शिबिरात त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत कसे उतरायचे, त्याची तयारी कशी करायची, पक्षाची शाखा प्रत्येक गावात, शहरात स्थापन करणे, तळागाळात ध्येय धोरणे नेणे, तेलंगणा राज्यात राबवलेल्या योजनांचा महाराष्ट्रात प्रसार करणे आदी बाबींचे प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले.
केसीआर यांनी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः विदर्भातील गडचिरोली, भंडारा हे जिल्हे तर मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांवर त्यांची भिस्त आहे कारण हे जिल्हे तेलंगणाला लागून आहेत आणि तेथील बहुसंख्य लोक तेलगू भाषा बोलतात. काही दिवसांपूर्वी नांदेड मधील ४० गावे आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांनी तेलंगणात समाविष्ठ होण्याचा ठराव केला होता त्यामुळे येथील लोकांची महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांविरुद्ध असलेल्या नाराजीचा फायदा आपल्याला मिळू शकतो असा त्यांचा होरा आहे त्यामुळेच त्यांनी या भागावर लक्ष केंद्रित केले असून त्यांना त्यात बऱ्यापैकी यशही मिळत आहे. या भागातून अनेक कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत त्यात काही माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र मे अब की बार किसान सरकार ही त्यांची घोषणा या भागात लोकप्रिय ठरत आहे. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या होत असताना तेलंगणात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही हा त्यांचा दावा शेतकऱ्यांना त्यांच्या पक्षाकडे आकृष्ट करत आहे शिवाय तेलंगणात राबवलेल्या दलित दिनबंधु योजनेचा प्रचार करण्यातही ते यशस्वी ठरत आहेत त्यामुळे दलित, वंचित समाजही त्यांच्याकडे वळत आहे. सुरवातीला केसीआर यांच्या पक्षाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांनाही आता त्यांची दखल घ्यावी लागत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याची विनंती केली आहे यावरून त्यांचा प्रभाव किती वाढत आहे ते लक्षात येईल. के सी आर यांनी महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी राजकारणातील जाणकार व्यक्तींना मात्र याचे जराही आश्चर्य वाटले नाही कारण मागील दोन वर्षात के सी आर यांनी जे राजकारण केले आहे ते राष्ट्रीय राजकारणात उडी घेण्याचेच निदर्शक होते. विशेषतः के सी आर यांनी तेलंगणामध्ये जेंव्हा दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आले तेंव्हापासून ते स्वतःला राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू मानू लागले आहेत. सुरवातीला म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी मोदींशी जुळवून घेतले आणि काँगेस व चंद्राबाबू नायडू यांच्याशी पंगा घेतला मात्र तेलंगणामधून काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष कमकुवत झाले तसे त्यांनी भाजपला प्रमुख विरोधक मानून भाजपला विरोध सुरू केला.
के सी आर यांचा भाजप विरोधाला केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाचीही किनार आहे ती अशी की, केंद्रात भाजपला प्रमुख विरोधक असलेली काँग्रेस गलितगात्र झाली आहे अशावेळी विरोधी पक्षांची मोट बांधून विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व आपल्या हाती आले तरी आपण २०२४ ला पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू असे स्वप्न त्यांना पडत आहे. पंतप्रधान व्हायचे असेल तर केवळ तेलंगणात आमदार खासदार जिंकून उपयोग नाही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातून जर आपल्याला काही आमदार खासदार जिंकता आले तर राष्ट्रीय राजकारणात आपले वजन वाढेल आणि बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर आपले स्वप्न साकार होईल असा त्यांचा होरा आहे शिवाय देशात काँगेस एकहाती विजय मिळवू शकत नाही त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण झाल्यास त्या आघाडीचे नेतृत्व आपसूकच आपल्याकडे येऊ शकते असे त्यांना वाटते आणि हे सर्व व्हायचे असेल तर महाराष्ट्र सारखे मोठे राज्य हाती असावे हे त्यांनी ओळखले आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात मोर्चे बांधणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.