लालपरीला ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचा आज म्हणजे १ जूनला ७५ वा वाढदिवस आहे. १ जून १९४८ रोजी पुणे – नगर या मार्गावर पहिली एसटी धावली होती. आज एसटी महामंडळाचा विस्तार झाला आहे. गाव तेथे एसटी, रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्यनुसार एसटीचा विस्तार होत गेला. गावागावात आज एसटी पोहचली आहे. एकूण ३१ विभागातून एसटीचे कामकाज केले जाते त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सेवा देखील पुरवली जातेय. कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात आज एसटी पोहचली आहे. राज्यातील कोट्यवधी प्रवाशांच्या लाडक्या लालपरीने काळानुसार कात टाकली असून, अनेक बदलही केले आहेत.

लालपरीपासून हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आता विठाई असा एसटीचा चेहरामोहरा बदलत गेला आहे. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक एव्हढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या भूकंप, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. खेड्यापासून शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्काचे वाहन म्हणजे एसटीच.

ग्रामीण भागातील करोडो विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ एसटीमुळेच पूर्ण होऊ शकले. म्हणूनच राज्यातील करोडो प्रवाशांच्या मनात एसटी विषयी आदराची भावना आहे. एसटी म्हणजे ग्रामीण भागासाठी वरदानच आहे. ग्रामीण भागात आजही एसटी हेच दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. जनतेचा प्रवास सुखकर व्हावा, प्रवाशांना तत्पर आणि वक्तशीर सेवा मिळावी यासाठी एसटीचे कर्मचारी झटत असतात पण गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधकारात बुडाले आहे.

हे आपण वाचलंत का?

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे त्यामुळे महामंडळाने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. कंत्राटी पदे भरून एसटीचे खाजगीकरण करण्याचा अट्टाहास केला जात आहे त्यामुळे कर्मचारी आणि महामंडळ यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे या वादात प्रवाशी मात्र भरडले जात आहेत म्हणूनच सरकारने एसटीच्या खाजगिकरणाचा अट्टाहास सोडून एसटीला सशक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी कर्मचारी नेमून त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा दिल्यास महामंडळाला पुन्हा सुगीचे दिवस येतील. प्रवाशांच्या मनात एसटी विषयी आपुलकीची आणि आदराची भावना आहे. सरकारनेही एसटी कडे आपुलकीने पाहिल्यास एसटीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. राज्यातील प्रवाशांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या आणि सर्वांच्या लाडक्या लालपरीला म्हणजेच एसटीला ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here