जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा; जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावा: जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज 8208166961
अमरावती :- जिल्ह्यातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची तसेच कालव्यांची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी कार्यवाहीला वेग द्यावा. आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव आदींचा शासनस्तरावर पाठपुरावा करावा. मात्र, कुठल्याही परिस्थितीत कामे रखडता कामा नयेत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांनी आज येथे दिले.
जलसंपदा विभागातील कामांचा आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला. यावेळी झुम ऍपवरून आमदार देवेंद्र भुयार हेही सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी मोर्शी व वरूड तालुक्यातील प्रश्न मांडले. जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
निम्न चारगड प्रकल्पाची काही कामे रखडली आहेत. यासंबंधी प्रकल्पाच्या एसएलडीसीचा प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीकडे तत्काळ पाठवावा.कोपरा व बोडणा प्रकल्पाच्या कामांबाबत परिपूर्ण माहिती सादर करावी, तसेच दुरुस्तीची आवश्यकता असलेली बांधकामे तातडीने दुरूस्त करण्यात यावीत, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी जलसंपदा प्रशासनाला दिले.
पर्यटन केंद्राबाबत प्रस्ताव द्यावा
मोर्शीतील अप्पर वर्धा व शेकदरी प्रकल्पावर पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल. त्यासाठी या दोन्ही ठिकाणी पर्यटन केंद्राबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.
अप्पर वर्धा धरणातून पाणी मागणीचे एकत्रित प्रस्ताव तयार करावेत. कालव्यांची स्वच्छता व्हावी. कालव्याच्या बाजुला खडीकरण करण्यासह कालव्याच्या दोन्ही बाजुला आंबा किंवा संत्र्याची झाडे लावून ती शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करावी. यासाठी २८० शेतकऱ्यांचा गट तयार करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी यावेळी दिले. बैठकीला जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.