महाड बिरवाडी मार्गे सुंदरराव मोरे महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी एसटी बससेवा सुरू
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बससेवा सुरू
📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267
पोलादपूर : -तालुक्यातील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाड, बिरवाडी, ढालकाठी, राजेवाडी, चांढवे, लोहारे,पोलादपूर इत्यादी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या महाड आगाराच्या विशेष सहकार्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध झाल्याची माहिती महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.नाथिराम राठोड यांनी दिली. सदर एसटी बस पोलादपूर येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयात येण्यासाठी सकाळी ६.३० वाजता दररोज महाड एसटी बसस्थानकातून सुटेल व त्यानंतर बिरवाडी, ढालकाठी मार्गे महाविद्यालयाकडे मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी सदर बस चोळई येथील महाविद्यालयातून दररोज दुपारी १२:३० वाजता सुटेल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सदर बस सेवा कोरोना कालावधीनंतर पुन्हा सुरू करण्यासाठी महाड आगार व्यवस्थापक शिवाजी जाधव आणि पोलादपूर एसटी बसस्थानक नियंत्रक श्री सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक रावेरकर यांनी केले आहे. सदर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाने महाड आगाराचे विशेष आभार मानले आहेत.