गोल्डन बॉय बनला डायमंड बॉय

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

भारताचा गोल्डन बॉय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने देशाचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याने ८७.६६ अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमात त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी डायमंड दोहा लिगमध्येही त्याने पहिलं स्थान मिळवले होते. सलग दोन डायमंड लिंगमध्ये पहिलं स्थान मिळणारा तो पहिला भालाफेकपटू म्हणूनच त्याचे हे विजेतेपद ऐतिहासिक आहे. त्याचा या ऐतिहासिक विजेतेपदाने त्याने देशातील १४० कोटी जनतेची मान उंचावली आहे अर्थात अशी ऐतिहासिक कामगिरी करण्याची त्याची ही पहिली वेळ नाही याआधी दोन वर्षांपूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये विक्रमी भालाफेक करून सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता.

विशेष म्हणजे ऍथलॅटीक्समध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पदक होते. याआधी मिल्खा सिंग, पी टी उषा हे पदकाच्या जवळ पोहचूनही पदकाला गवसणी घालू शकले नव्हते ती किमया नीरजने करून दाखवली होती. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि दोनदा डायमंड लीग स्पर्धा जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा जन्म २७ डिसेंबर १९९७ ला हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे शिक्षण चंदीगड येथे झाले. लहानपणापासून त्याला खेळाची आवड होती. त्याचे वजनज ८० किलो होते त्यामुळे गावातील लोक त्याला सरपंच म्हणत. कुस्ती, कबड्डी असे खेळ त्या गावातील मुले खेळत पण नीरजने मात्र भालाफेक या खेळाची निवड केली. विशेष म्हणजे त्याच्या गावात कोणीही भालाफेक हा खेळ खेळत नव्हते.

भाला फेक हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जातो हे देखील त्या गावातील काही लोकांना माहीत नव्हते त्यामुळे अनेकांनी त्याला भालाफेक सोडून कुस्ती हा खेळ खेळण्यास सांगितले. नीरजने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भालाफेकीतच करियर करायचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे असा निश्चय केला. त्यासाठी त्याने तंदुरुस्तीवर भर दिला. खूप प्रयत्न करून स्वतःचे वजन कमी केले. भालाफेकीचा दररोज सराव केला. खेळात सातत्य ठेवले आणि दिवसेंदिवस चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चांगली कामगीरी केल्याने २०१६ साली दिल्लीत झालेल्या आशिआई स्पर्धेत भारतीय पथकात त्याची निवड झाली. आपल्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर २०१६ मध्येच पोलंडमध्ये झालेल्या २० वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८४. ४८ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. अंजु बॉबी जॉर्ज नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एथलॅटीक्समध्ये भारताला पदक मिळवून देणारा नीरज हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला होता. एकाच वर्षात दोन महत्वाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने त्याचे जगभर नाव झाले.

या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कंडिशन ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली. २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने ८८.०७ मीटर भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या नीरजला २०१९ मध्ये मात्र दुखापतीने घेरले. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यामुळे त्याला काही महिने खेळापासून दूर राहावे लागले. २०२० साली जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या ऑलिम्पिक तयारीवरही मोठा परिणाम झाला असे असतानाही या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचेच या निश्चयाने तो मैदानात उतरला. पहिल्या प्रयत्नातच त्याने ८७.०३ मीटरवर भाला फेकून आघाडी मिळवली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकत पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत सुधारणा केली तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला ७६.७९ मीटरवर गेला. त्याचा चौथा आणि पाचवा प्रयत्न मात्र अवैध ठरला. मात्र बाकी स्पर्धकांची कामगिरी सर्वसाधारण राहिली त्यामुळे नीरजची आघाडी कायम राहिली. सहाव्या प्रयत्नात नीरजने ८४.२४ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचे सुवर्णपदक निश्चित झाले की देशवासीयांनी दिवाळीच साजरी केली होती

आजही तोच उत्साह देशवासीयांमध्ये आहे. सलग दुसऱ्यांदा डायमंड लीगस्पर्धा जिंकून भारताचा हा गोल्डन बॉय डायमंड बॉय बनला आहे. त्याच्या या यशाने देशातील १४० कोटी देशवासियांची छाती अभिमानाने फुगली आहे. डायमंड बॉय नीरज चोप्राचे मनापासून अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here