बळीराजा हा जगाचा पोशिंदा महापुरुष…!

सौ. संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

७८२१८१६४८५

आज १ जुलै शेतकरी दिन त्या निमित्ताने सर्व शेतकरी बंधू, भगिणींना शेतकरी दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा एका अर्थाने बघायला गेले तर बळीराजावर बोलणं फार सोपं आहे, त्याच्यावर लिहिणं अजून सोपं आहे पण, खास करून त्याला वाचणे व समजून घेणे फार कठीण काम आहे त्यासाठी एकदातरी त्या,बळीराजासारखे एकतरी दिवस जगून बघावे लागते तेव्हाच,बळीराजा कळत असतो. नुसते बोलण्याने किंवा लिहिण्याने त्याच्यात असलेली महानता कळत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.

बळीराजा हा जगाचा पोशिंदा महापुरुष आहे सारा विश्व त्याला चांगल्याप्रकारे जाणतो आहे कारण, त्याच्यात तेवढी महानता आहे तो, सर्वगुणसंपन्न आहे आणि खास करून जगवता आहे. पण, आजच्या घडीला बघितले तर त्याचाच बळी घेतला जात आहे मग राजा तरी कसा‌ म्हणावे..? आज त्याला ह्या, निसर्गाने,महा महागाईने, व त्याच्या मालाला पाहिजे तो भान न मिळाल्यामुळे आज तो भिकारी झाला आहे. राजाला तर सारी प्रजा घाबरत असते व त्याचा सन्मान करत असते जर एखाद्या वेळी राजावर संकट आले तर.. त्याच्या मदतीला सारी प्रजा धावून येत असते मग बळीराजा सुध्दा एक राजाच आहे, सर्वात श्रेष्ठ आहे मग त्याच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा का बरं त्याची मदत करण्यासाठी कोणी धावून येत नाही… ? फक्त, पोशिंदाच म्हटले की झालं असच आज दिसून येत आहे. बळीराजावर आलेले संकटे त्याचे जीव घेत आहेत तो गळफास घेऊन आत्महत्या करत आहे शोकांतिका म्हणावे लागेल की, अशा घटना घडत असताना कोणालाही दिसत नाही आणि दिसते पण, काळजीपूर्वक लक्ष दिल्या जात नाही. बळीराजा स्वतः साठी कधी जगतच नाही कारण, स्वार्थी होऊन जगणे त्याला अजिबात आवडत नाही पण दुसऱ्यांसाठी धावून जायला व त्यांना पोसायला मात्र तो मागे पुढे बघत नाही तरीही आज त्याच्या मालाला भाव विचारतात ही कसली माणुसकी. ..? जे,स्वतः रूपयाची कोणाला मदत करत नाही ते भिकारी होऊन बळीराजाच्या शेतावर जाऊन भाजीपाला फुकटात मागून आणतात आणि वेतनवाढी साठी आंदोलन करतात काय म्हणावे अशा विचारसरणीला.

आज बघायला गेले तर…बळीराजा किती संकटात सापडला आहे हे जाणून घेणे समाजातील प्रत्येक माणसांचे आद्य कर्तव्य आहे. आज बळीराजा शेतावर गेलाच नाही कारण पावसाचा पत्ताच दिसत नाही तो किती चिंतेत सापडला असेल हे जाणून घेण्यासाठी कोणी वेळ काढत नाही. मग सांगा बळीराजाला आधार तरी कोणाचा आहे…?

        आज सर्वांनी मिळून त्याच्याकडे पाठ फिरवली आहेच पण निसर्गानेही जमून पाठ फिरवली आहे. जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा धोधो पडत असतो आणि सारा पीक सडून जाईपर्यंत जायचं नाव घेत नाही आणि जेव्हा त्याची गरज असते तेव्हा मात्र डोळे वटारून परीक्षा घेत असतो खरंच सांगा इथे बळीराजाचा काय दोष आहे..? जेव्हा, जेव्हा बळीराजाच्या जीवनात संकटे येतात तेव्हा सर्वांना सुखाची झोप लागत असते हे कसं काय होऊ शकते. ..? आज जगाला पोसणारा पोशिंदा संकटात असताना पाहून झोप लागणे म्हणजे कुठेतरी त्याचा विसर पडणे होय, असं म्हणायला काहीच हरकत नाही म्हणूनच तर..आज त्याच्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, आपुलकीने मदत करत नाही, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणी ताकदीने झटत नाही त्यामुळे बळीराजाचा विकास होत नाही आजही तो तिथेच आहे आणि समोरही तिथेच राहणार आहे कारण त्याचा वाली दिसत नाही कदाचित त्या वालीला जन्म घ्यावा लागेल.

साऱ्या लोकांच्या जीवनातील संकटे संपतात पण बळीराजाच्या जीवनातील संकटे कधीच संपत नाही तो,मेला किंवा वाचला त्याच्याशी कोणाचं देणं, घेणं नाही आपला विचार करतात भरभरून वेतन असुन सुध्दा बळीराजाचे असोत किंवा गोर, गरीबांचे काम करायचे असतील तर लाच घेतात अशा भिकारी लोकांच्या वेतनात पुन्हा वाढ होत असते देशाला भिकारी करून सोडले आहेत अशाच लोकांची आजकाल शासनाला सुद्धा गरज आहे.पण,जो जगाला पोसणारा महापुरुष आहे त्याची मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात दखल घेतली जात नाही त्याच्या उच्च शिक्षित असलेला मुलगा आज बेरोजगार आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. 

     चला एकदा तरी या महापुरुषाला वाचविण्यासाठी पुढाकार घ्या तो वाचेल तर जगाला पोसू शकेल नाही तर हातात मुठभर पैसे असून सुद्धा कोणी पैसे खाऊन जगणार नाही. कारण जीवन जगतेवेळी पैशाची गरज तर असतेच पण त्यापेक्षा जास्त गरज अन्नाची असते आणि तेच अन्न बळीराजा कमवत असतो, अफाट कष्ट करत असतो तेव्हाच भाकर खायला मिळते माणुसकीच्या नात्याने एवढी तरी त्याची जाणीव असू द्यावे व त्याच्यासाठी एकदाचे आपले काम बाजूला सारून त्याच्या विषयी विचार करावे तो जगाचा पोशिंदा आहे कोणीही विसरता कामा नये. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here