विद्यार्थ्यांमध्ये कायदा व महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी पोलादपूर पोलिसांचा उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये कायदा व महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी पोलादपूर पोलिसांचा उपक्रम

श्री सिध्देश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर :- पोलादपूर पोलिस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कायदा व महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दालाल मॅडम यांच्या आदेशाने पोलादपूर एपीआय श्री आनंद रावडे साहेब यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज जनसेवा प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत पालक सभेच्या निमित्ताने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलीस काका व पोलीस दीदी यांनी शाळेला भेट दिली. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सौ. ऋतुजा रंजेश पवार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सोशल मीडियाचा योग्य वापर, सायबर गुन्हे, पोलीस हेल्पलाईन 112, तसेच सायबर हेल्पलाईन 1930 याविषयी सखोल माहिती दिली. त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला तक्रार निवारण कायदे, संरक्षण हक्क, तसेच दामिनी पथकाच्या कार्यपद्धतीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

महिलांवर होणारे अन्याय, छेडछाड किंवा त्रास यासारख्या घटनांमध्ये त्वरित दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. दामिनी पथकाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळू शकते, यावर विशेष भर देण्यात आला.

पोलीस कर्मचारी श्री. अमोल झेपले यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत आणि सुरक्षिततेसंबंधी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास मांढरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. पोलीस काका, पोलीस दीदी आणि दामिनी पथक वेळोवेळी शाळा व महाविद्यालये बंद होताना गस्त घालत असल्याचे पालकांनी सांगितले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचे भान निर्माण होऊन महिला सुरक्षेबाबत सजगता वाढेल, असा विश्वास पालक व शिक्षक वर्गाने व्यक्त केला.