शाहू महाराज जयंतीनिमित्त महापुरुष जयंती उत्सव समितीकडून शालेय साहित्य वाटप
सिध्देश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर तालुका मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष जयंती उत्सव समितीतर्फे एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. ३० जून २०२५ रोजी पोलादपूर तालुक्यातील पवारवाडी, पार्लेवाडी, गुडेकर कोंड व नाणेघोळ या आदिवासी वस्तीतील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला वाकड ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच सौ. बाबर, नीलकंठ साने, मुख्याध्यापक संतोष शेलार, मनोज सकपाळ, सोनावणे, समीर सालेकर तसेच समितीचे पदाधिकारी संदीप जाबडे, विवेकांत मोरे, अरुण मोहिते, अमित वाडकर, नरेश मोरे, सिद्धेश पवार, मंथन मोरे, नरेश यादव व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संदीप जाबडे म्हणाले, “महापुरुषांची जयंती ही केवळ उत्सव न राहता विचारांची जयंती झाली पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मागील चार वर्षांपासून आम्ही हा उपक्रम स्वखर्चाने राबवतो आहोत.”
अरुण मोहिते यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा आमचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. विवेकांत मोरे यांनी शाहू महाराजांनी शिक्षण व सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकत, “त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली,” असे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी अशा उपक्रमांत पुढाकार घेण्याची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.