बाप्पा-गौराईला जड अंतःकरणातून निरोप”

75

“बाप्पा-गौराईला जड अंतःकरणातून निरोप”

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला मंगळवारी (दि.२) भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. गेल्या आठवडाभर भक्तांनी गणरायाची व गौराईची भक्तिभावाने पूजा-अर्चा व आरत्या करून मंगलमय वातावरण निर्माण केले होते. आता जड अंतःकरणातून या उत्सवाला निरोप देण्याची वेळ आली आहे.

यंदा रायगड जिल्ह्यात समुद्र, नदी, तलाव आणि कृत्रिम तलाव अशा ५०० पेक्षा अधिक ठिकाणी तब्बल ७२ हजार ६४३ गणपती व गौराईंचे विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणुकीचा आनंदोत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पाडावा, यासाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात बुधवारी (दि.२७ ऑगस्ट) झाली होती. यावेळी १ लाख २ हजार ४८४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. दुसऱ्याच दिवशी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले असून २५ हजार ५५१ मूर्तींचा जलसमाधी सोहळा पार पडला. रविवारी (दि.१) घराघरांत गौराईचे आगमन झाले. यावेळी १६ हजार १७५ गौराईंची प्रतिष्ठापना करण्यात आली.

संपूर्ण जिल्ह्यात भजन, कीर्तन, फुगड्या, नाचगाणी, धावऱ्या नाच, कुस्ती अशा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव रंगला. महिलांनी पारंपरिक पोशाखात गौराईची पूजा करून वस्त्रालंकार व साजशृंगार अर्पण केला.

मंगळवारी ५६ हजार ४६८ गणेशमूर्ती व १६ हजार १७५ गौराईच्या मूर्ती आणि मुखवटे विसर्जनासाठी नेले जाणार आहेत. मिरवणुकीत ढोल-ताशा, खालू-बाजे, बेंजो व DJच्या तालावर जल्लोष होणार आहे.

पोलीस प्रशासनाची तयारी

विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रायगड पोलिसांचा मजबूत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल २ हजार ८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड जवान तैनात केले जाणार आहेत.

याशिवाय १ हजार १५० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. मिरवणुकीत वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

“सण हा आनंदात आणि शांततेत साजरा करा. लेझर लाइट्स बंदी आहेत. वयोवृद्ध, महिला आणि मुलांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या,” असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.