"डाकिण...!" भयकथा...
 "डाकिण...!" भयकथा...

 “डाकिण…!” भयकथा…

 "डाकिण...!" भयकथा...
“डाकिण…!” भयकथा…

संदीप देवीदास पगारे
खानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक
भ्रमणध्वनी ७६२०५१२१६५
सकाळी मी नेहमीप्रमाणे घाईगडबडीत दोन-तीन पुस्तकं, पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा बॅगमधी टाकला आणि माझ्या बाईकवर स्वार होऊन कामावर (महाविद्यालयात) निघालो.महाविद्यालय ते घर हा प्रवास जरा लांबचा असल्याने प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून माझ्या सवयीप्रमाणे कानात हेडफोन टाकून कमी आवाजात मोबाईलवरील जुनी गाणी ऐकत ड्राईव्ह करत होतो.साधारणपणे १५ किलोमीटर गेल्यावर एका सुंदर युवतीने मला हात दाखवत माझ्याकडे लिफ्ट मागितली. तसं मी लेडीजला सहसा गाडीवर घेत नाही. कारण ओढणी किंवा पदर चाकात अडकून मी दहा-बारा वेळेस नक्कीच पडलो असेल, पण सकाळचं वातावरण आणि त्यातही हा खेडेभाग असल्याने वाहन मिळणं शक्यतो कठीणच, या विचारानं मला तिची दया आली‌. मी माझी गाडी थांबवली आणि तिची विचारपूस करत म्हटलो, कुठं जायचं…? यावर ती हसली नी म्हटली “पुढच्या चौफुलीपर्यंत” (रस्त्यावर असणारे चार फाटे) ड्राईव्ह करताना आमच्यात थोडं बोलणं झालं. माझं नाव संदीप आणि तुमचं ? मी तिला नाव विचारल्यावर तिने कल्पना असं सांगून, “तुम्ही रोज याच रस्त्याने जाता का ?” असा प्रश्न केला. माझा दररोजचा प्रवास असल्याने मी क्षणाचाही विलंब न करता लगेच हो म्हटलं. मग तिनं, “अय्या खरचं…! मीपण याच रस्त्याने याच वेळी जाते आणि संध्याकाळी पाच वाजता माझा दवाखाना बंद करून परत येते.” असं म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला.या संवादातून मला ती डॉक्टर आहे आणि सकाळ-संध्याकाळ याच मार्गाने प्रवास करते हे लक्षात आलं. बोलता बोलता तिनं सहज विचारलं, “तुम्ही जॉब करता वाटतं…!” मी हो म्हटलं आणि सांगितलं की एका नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे पण विनाअनुदानित. आमचं संभाषण सुरू असताना चौफुली आली. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. ती बाईकवरुन उतरली आणि गालावर गोड हास्य आणून थॅन्क्स-बाय म्हणत हाताने इशारा करून आम्ही निरोप घेतला.

महाविद्यालयातील काम आटपून घरी जाण्याची वेळ झाली.सहकाऱ्यांसोबत/मित्रांसोबत बोलत बोलत मी माझ्या बाईकजवळ आलो.बॅग नेहमीप्रमाणे गळ्यात अडकवून बाईक स्टार्ट केली नी सहकाऱ्यांचा निरोप घेऊन घरी निघालो. प्रवास करत करत चौफुलीवर येताच मला सकाळची आठवण झाली. मी नकळतच आजुबाजूला बघितले आणि समोरुन कल्पना येताना दिसली. तिने लांबूनच मला ओळखत हाताने इशारा केला. मीही तिच्याकडे बघून गाडीचा हॉर्न वाजविला. ती गाडीवर बसून मला म्हटली, “आपण दोघंही ह्याच मार्गाने येतो, मी तुमच्याकडे दररोज लिफ्ट मागितली तर चालेल का ?” मीही प्रवासात कुणीतरी सोबत असावं या विचारानं तिला हो म्हटलं, खरंतर दोघांचाही स्वभाव बोलका, मनमिळावू पण मी ड्राईव्ह करत आहे‌. याचं भान ठेवून जरा कमी बोलत होतो. बोलता बोलता तिचा स्टॉप आला. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली आणि दोघांनीही एकमेकांचा व्हाट्सअप नंबर घेतला.

मी संध्याकाळी घरी आल्यावर शेतात गेलो. शेतातून आल्यावर जेवण करून बेडवर पुस्तक वाचत असताना फोनवर अचानक लक्ष्य गेलं‌. फोन सायलेंट मोडवर होता आणि कल्पनाचे तीन मिसकॉल तसेच व्हाट्सअपलाही मेसेज आला. मग मी पण तिच्यासोबत व्हाट्सअप चॅट करत सकाळी भेटूया असा रिप्लाय दिला. नेहमीप्रमाणे मी सकाळी कामावर निघालो. थोडं अंतर कापल्यावर कल्पनाचा स्टॉप आला. ती माझ्याही आधी तिथं हजर. पुन्हा गाडीवर आमचं बोलणं सुरु झालं. दिवसामागून दिवस जात होते कल्पनाशी घट्ट मैत्री झाली. आतातर दोघंही रातभर व्हाट्सअप चॅट करत होतो. मैत्रीचं रुपांतर लवकरच प्रेमात झालं, मग काय रस्त्यात अगदी कुठेही जागा मिळेल तिथे सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखं झाडाखाली हातात हात घेऊन तासनतास बोलत रहायचो. “मी जरी पेशाने डॉक्टर असले परंतु अनाथ आहे.पाच वर्षापूर्वी माझी फॅमिली कार एक्सीडेंटमध्ये गेली, माझं आगे-पिछे कोणीही नाही‌. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी डॉक्टर झाले. मला प्रेमी युगुलांसारखं पळून जाऊन लग्न करायचं नाही, तुमच्या घरच्यांच्या संमतीने आपण लग्न करुया, पण ते आपल्याला सपोर्ट करतील ?” असं ती फार हळव्या मनानं मला सांगत होती. एक दिवस आम्ही दोघंही माझ्या घरच्यांसमोर आमच्या प्रेमाची कबुली देवून लग्नाची परवानगी घ्यावी असं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे मी एक दिवस तिला माझ्या घरी बोलावून तिची सर्व हकिकत माझ्या घरच्यांना सांगितली.घरच्यांनी तिला अगदी मायेनं जवळ घेऊन सांगितले की,तुम्हां दोघांच्या सुखातच आमचं सुख, तुम्ही खूश तर आम्हीही खूश असं बोलून माझ्या घरच्यांनी लग्नाची परवानगी दिली.पुढच्याच आठवड्यात मुहूर्त शोधला आणि मग अगदी थाटामाटात आमचं लग्न झालं. “आपण हानिमूनसाठी महाबळेश्वरला जाऊया असं कल्पनानं सांगितलं. ” महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण, आम्ही दोघांनी फक्त ऐकलं होतं.पण कधीचं बघितलं नव्हतं. मग रातभर प्रवास करुन दुसऱ्या दिवशी सकाळी महाबळेश्वरला पोहोचलो.रस्त्याच्या कडेला रंगबिरंगी अनेक पंचतारांकित हॉटेल जणू आमच्याच स्वागतासाठी दिमाखात उभी आहे असं मला वाटत होतं.हॉटेलमध्ये प्रवेश करताच रिसेप्शनिस्ट म्हणून नुकतीच तारुण्यात पदार्पण केलीही सुंदर तरुणी दिसली, तिनं अबोली कलरची साडी आणि गुलाबी रंगाचा कोट परिधान केला होता.तिची आणि आमची नजरेला नजर भिडली व गालात हसून आम्हाला म्हटली, “हनिमून कपल. ” मी होकारार्थी मान हलवली आणि रुम बुक केली व आमचं प्रवासातील luggage (बॅगा/सामान) रुममध्ये ठेवून त्या रिसेप्शनिस्टला सांगितले की, आम्ही दिवसभर फिरून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत येऊ आणि रातभर थांबून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत काउंटरवर चावी जमा करु.

दिवसभर मी आणि कल्पना महाबळेश्वरच्या त्या निसर्गरम्य,चैतन्यमय वातावरणात फिरत होतो,त्यातही पावसाचे दिवस होते तो रिमझिम पाऊस आणि अंगाला स्पर्श करणारा थंडगार असा खट्याळ वारा आमच्या गुलाबी दिवसात जणू रोमान्सची भर घालत होता.कल्पनाच्या सहवासात आणि निसर्गाच्या सान्निध्यात दिवस कसा गेला कळलंच नाही.रात्र होताचं आम्ही हॉटेलकडे रवाना झालो.हॉटेमधलं ते रोमॅंटिक कॅण्डल लाईट डिनर करून आम्ही रुममध्ये आलो आणि बघतो तर काय ? त्या रिसेप्शनिस्टनं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिवसभरात सांगून आमच्या रुमची अगदी गुलाबी सजावट केली होती,आता रातभर रुमच्या बाहेर जायचं नाही या विचारानं मी दरवाजा आतून बंद केला. कल्पनाला मेकअप करणं फारसं आवडत नसे पण आज ती खूप नटूनथटून मोरपंखी शालू नेसून माझ्यासमोर आली.जणू एखादी मोरनीच माझ्या समोर उभी असल्याचा भास झाला.मी टेबलावरची मेणबत्ती पेटवली आणि बेडरुमधील सर्व लाईट बंद करून कल्पनाला अलगद उचलून बेडरूमच्या बेडवर ठेवलं.तिच्या हाताला स्पर्श करत तिला अलगद मिठीत घेऊन एक हात तिच्या पाठीवरून फिरवत तिनं माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याला हाताचा स्पर्श होताच ओठांचा रस प्राशन केला.डोळ्यांच्या पापण्या दोघांच्याही नकळतपणे झाकून ओठांची भाषा सुरू झाली. या स्वर्ग-सुखाचा आनंद घेत असताना माझ्या गळ्याला अलगद काहीतरी टोचल्याचा भास झाला आणि माझ्या शरीरातील सर्व उर्जा कोणीतरी खेचून घेत आहे असं क्षणभर वाटलं.मी हळूवारपणे डोळे उघडले. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात कल्पनाने चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी मोकळे सोडलेले लांब केस अगदी संपूर्ण बेड व बेडच्याही खाली पसरले होते,तिचे डोळे खूपच मोठे आणि लालभडक दिसत होते.तिने तोंडाचा जबडा उघडताच सुळे दात स्पष्ट दिसू लागले. चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरुकुत्या दिसू लागल्या,तिच्या हातांची नखं वेगाने वाढत होती.काही क्षणातच तिचा चेहरा एखाद्या हॉरर सिनेमात दाखविल्या जाणाऱ्या डाकिणीसारखा विद्रुप दिसू लागला. ती माझ्याकडे बघून मोठ्याने हसायला लागली. मी घाबरलो नी जिन्यावरून पळत पळत खाली रिसेप्शनिस्ट जवळ आलो.पण दिवसा असणारी ती तरुणी (गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली) नाइट ड्युटी ला नव्हती. तिथं साधारणपणे पन्नास-पंचावन्न वयाचे एक गृहस्थ खुर्चीवर आरामात झोपले होते.माझी नजर त्यांच्या गुलाबी कोटवर गेली. त्यावर Mr.S.P.Gaikwad असं इंग्रजीत लिहिलं होतं. मी गायकवाड काकाssss गायकवाड काकाssss गायकवाड काकाssss अशा त्यांच्या समोर जोरजोरात हाका मारल्या.शेवटी वैतागून त्यांना हाताने जोरात धक्का देऊन उठविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.माझी नजर सहज भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर गेली,रात्रीचे सव्वादोन वाजले होते. हॉटेलमधील सर्व लोक गायकवाड काकांसारखे गाढ झोपले असतील असा विचार माझ्या मनात आला.मला परत बेडरुम मधला प्रसंग आठवला आणि भितीने हातपाय थरथरत मी गायकवाड काकांच्या खुर्चीजवळ झोपी गेलो.

सकाळी मला उशीराच जाग आली.खुर्चीजवळून उठत घड्याळाकडे बघितले तर दहा वाजले होते,रिसेप्शनिस्ट तरुणी (गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली) रजिस्टरमध्ये काहीतरी लिहीत होती. आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती.मी त्यांच्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला, पण माझं बोलणं कोणीही ऐकत नव्हतं आणि माझ्याकडं बघतही नव्हतं अगदी कालच ओळख झालेली ती गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली तरुणी सुध्दा…

थोड्या वेळाने ती तरुणी गायकवाड काकांना उद्देशून म्हटली, “अरे चाचाजी कल सुबह हनिमून के लिये एक कपल आया था,रुम नं ४३० आज आठ बजेही जानेवाला था लेकीन रुम नं ४३० की चाबी अबतक नही आयी, जा के देखो जरा.” हे शब्द कानावर पडताच गायकवाड काकांनी काऊंटरवरुन डुप्लीकेट चावी घेतली आणि जिन्यावरून माझ्या रुमकडे रवाना झाले.अर्थात त्यांच्यासोबत मीही होतो‌.पण ते माझ्याकडे बघत नव्हते आणि मी ओरडून सांगत होतो की गायकवाड काकाsss दरवाजा उघडू नका.पण त्यांना माझं बोलणं ऐकू जात नाही,असं मला रात्रीपासून वाटत होतं.शेवटी आम्ही दोघंही (गायकवाड काका आणि मी) जिन्यावरून चालत चालत रुम नं ४३० पर्यंत पोहोचलो. गायकवाड काकांनी दरवाजा तीन-चार वेळा ठोकून बघितला, मग त्यांनी खिशातून डुप्लीकेट चावी काढत कुलूप उघडले आणि रुममध्ये आल्यावर मला माझाच देह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेला दिसला,जणू एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला करून गळ्याचा (नरडीचा) फडशा पाडला. मी माझ्याच शरीराला हात लावून उठविण्याचा प्रयत्न करत होतो आणि गायकवाड काका खूणsss खूणsss खूणsss असं जोरजोरात ओरडत जिन्यावरून पळत सुटले आणि मी त्यांच्या पाठीमागून ओरडत होतो,मी जिवंत आहेsss मी जिवंत आहेsss असं म्हणत असतानाच माझा जिन्यावरून पाय घसरला आणि मी जोरात खाली पडलो.माझ्या डोक्याला जब्बर मार लागला.मी डोळे उघडताच घरातील सर्व मंडळी मला बघून हसली आणि म्हणाली, “अरे किती ओरडतो झोपेत ! पलंगावरून पडला तरी झोप झाली नाही का…?” मी तोंडावर आलेला घाम पुसत,एव्हाढ्या मोठ्या जीवघेण्या स्वप्नातून सुखरूप वाचलो.या विचाराने गालातल्या गालात
खुदकन हसलो…

टीप – सदर भयकथा ही पूर्णतः काल्पनिक असून याचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही, संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तसेच या कथेतून लेखकाला कोणत्याही प्रकारच्या प्रथा, अंधश्रद्धेस खतपाणी घालायचे नाही. ही कथा फक्त मनोरंजन या हेतूने लिहिली आहे. याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here