पुण्यातील एका डॉक्टर महिलेची तब्बल ४१ लाख रुपयांनी नागपूरमधील भामट्यांनी केली फसवणूक.

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953
नागपूर: – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देतो असे सांगून पुण्यातील एका डॉक्टर महिलेची तब्बल ४१ लाख रुपयांनी नागपूरमधील भामट्यांनी फसवणूक केली. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून चौघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.फसवणुकीचा प्रकार बघता एखादी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या डॉ. शिल्पा सुरेश ढेकळे (वय ४४ रा. गुलविहार कॉलनी, नाशिक रोड, पुणे) यांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा होता. यासाठी त्यांना ‘च्यूज युवर करिअर’ नावाच्या ॲडमिशन कन्सलटंट असलेले सचिन कश्यप यांचा फोन आला. त्याचेशी झालेल्या संवादात सचिन कश्यप यांनी डॉ. शिल्पा ढेकळे यांना प्रथम केरळ येथे प्रवेशासाठी जागा रिक्त असल्याचे सांगितले.
मात्र, काही दिवसातच तिथे जागा नसल्याचे कारण देत, नागपूरला एक जागा रिक्त असल्याचे सुचविले. त्यासाठी त्यांना ४१ लाख रुपये द्यावे लागतील, असेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन डॉ. शिल्पा ढेकळे नागपूरला आल्या. त्यांनी येथे प्रशांत नामक व्यक्तीची भेट घेतली आणि ४० लाख रोख रक्कम तर एक लाख आपल्या मोबाईलवरून त्याच्या अकाउंटला टान्सफर केले. त्याने त्यांना दोन दिवसात प्रवेश करून देण्याचे आश्वासन दिले होते. नंतर त्यांच्यासोबत कोणीच संपर्क केला नाही. फोनही उचलत नसल्याने डॉ. शिल्पा ढेकळे यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी थेट अजनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सचिन कश्यप, श्रीकांत, चंद्रशेखर आत्राम आणि साखरे नामक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करीत, चौघांवर गुन्हे दाखल केले. अद्याप या प्रकरणातील अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. संबंधित सर्वच जण फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
नीट’च्या अंगाने तपास
काही दिवसांपूर्वी ‘नीट’ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपुरातील संबंधित शिकवणी वर्गांवर छापे घातले होते. त्यातून क्लासेसचे नीट कनेक्शन उघडकीस आले होते. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारावर वैद्यकीय प्रवेश देण्याचे रॅकेट देशभरात सक्रिय असल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणात पाच जणांना पथकाने अटक केली होती. त्यामुळे हे प्रकरण त्याचेशी निगडित आहे काय? याचा तपास अजनी पोलिस करणार असल्याचे पोलिस निरीक्षक विजय तलवारे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.