वर्धा जिल्ह्यात 65.32 टक्के मतदारांनी बजावला हक्क.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी वर्धा जिल्ह्यात 5 केंद्रांवर शांततेत मतदान 19 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद, आता बहुमताच्या कौलाकडे साऱ्यांचे लक्ष.
वर्धा :- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा एक भाग म्हणून मंगळवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर आज शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण 23 हजार 68 मतदार असून मंगळवारी प्रत्यक्षात 65.32 टक्के मतदारांनी सायंकाळी उशीरापर्यंत मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
वर्धा जिल्ह्यातील तीन उमेदवारांसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात 23 हजार 68 मतदार असून यात 14 हजार 45 पुरुष तर 9 हजार 30 महिला आणि तीन इतर मतदार आहेत. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 35 मतदान केंद्रांवर 9.1 टक्के मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर दुपारी 12 वाजेपर्यंत 3 हजार 677 पुरुष तर 1 हजार 306 महिलांनी मतदान केले होते. जसजसा सूर्य मावळतीला गेला तस तसा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला. दुपारी 2 वाजेपर्यंत 6 हजार 127 पुरुष तर 2 हजार 732 महिला पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी ४ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील 14 हजार 45 पुरुष मतदारांपैकी 8 हजार 549 तर 9 हजार 20 महिला मतदारांपैकी 4 हजार 370 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे सिंदी रेल्वे येथील मतदान केंद्रावर मंगळवारी दुपारी एका कोविड बाधित पदवीधर मतदाराने प्रत्यक्ष मतदान केले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराच्या शरिराचे तापमान थर्मलस्कॅनिंग गनच्या सहाय्याने तपासण्यात आले. तर ऑक्सिमिटरच्या सहाय्याने मतदारांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली. एकूणच कोरोना संकट लक्षात घेवून खबरदारीच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 15 हजार 68 मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.