जैन धर्म स्वीकारण्यासाठी होतोय छळ, ब्राह्मण सुनेची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार

 

अहमदाबाद:- जैन धर्म स्वीकारण्यासाठी सासू सासऱ्यांकडून छळ होत असल्याची तक्रार एका सुनेने केली आहे. ही घटना अहमदाबाद इथली असून या प्रकरणात हुंडाही मागण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

जैन धर्म स्वीकारण्यासाठी छळ

या महिलेचा विवाह 2017 मध्ये झाला होता. महिला ब्राह्मण असून तिचा पती जैन धर्मीय आहे. हे दांपत्य एका खासगी कंपनीत काम करतं. फेब्रुवारी महिन्यात तिचा पती जर्मनीला कामासाठी निघून गेला.

त्याने जाताना तिला आपल्या सोबत घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं. मात्र, तो तिला तिथेच ठेवून निघून गेला. त्यानंतर तिचे सासू-सासरे तिचा छळ करू लागले. तिला जैन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला.

पतीनेही केली मारहाण

तिने याला विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा छळ सुरू केला. जेव्हा महिलेचा पती जर्मनीहून परतला तेव्हा त्यानेही तिला मारहाण केली. ही मारहाण करण्यासाठी सासू-सासऱ्यांनी त्याला उद्युक्त केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

त्यानंतर तिच्या पती आणि सासूसासऱ्यांनी तिला हुंडा आणण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. जेव्हा तिने याला नकार दिला तेव्हा नवऱ्याने जबरदस्तीने तिला माहेरी पाठवून दिलं. तीन महिने या महिलेने आपल्या पतीची वाट पाहिली आणि अखेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here