बुलंदशहरमध्ये महिला सब इन्स्पेक्टरची आत्महत्या.

उत्तर प्रदेश:- बुलंदशहरमध्ये एका महिला सबइन्स्पेक्टरने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘ही माझ्या कर्मांची फळे आहेत’ असे या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. आरजू पवार असे महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या अनूप शहर ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या का केली असावी, तसेच त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटचा अर्थ काय, असे प्रश्न पोलिसांना पडले आहेत.

महिला पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता ब्रेनडेडमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

आरजू पवार या 2015 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या शामली जिल्ह्यातील असून बुलंदशहरच्या जनपदमधील अनूपशहर ठाण्यात कार्यरत होत्या. अनूपनगर परिसरातच त्या भाड्याने घर घेऊन राहत होत्या. आरजू दररोज घरमलिकीणीसोबत जेवण करत होत्या. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांना बोलावण्यात आले. त्यावेळी थोड्या वेळात येते, असे त्यांनी सांगितले.

रात्री 9 वाजेपर्यंत त्या जेवणासाठी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फोन करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे घरमालकीण त्याच्या खोलीत गेल्या. मात्र, दरवाजा आतून बंद होता. घरमालकीणीने त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी ओढणीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या खोलीत सुसाइड नोटही आढळली असून ‘ही माझ्या कर्माची फळे आहेत, आपल्या मृत्यूसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत’ असे त्यात म्हटले आहे.

या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला असून त्यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांचा मोबाईल फोन लॉक असून त्यांचे कॉल डिटेल तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले होते, याची माहिती घेण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here