सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर २१७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं या २ बळी गमावत हे लक्ष्य पार करून विश्वचषक खिशात घातला. कर्णधार पृथ्वी शॉसोबत आज शुबमन गिल ऐवजी मनजोत कालरा सलामीला आला. शॉ आणि मनजोत या जोडगळीने चांगली सुरुवात करत ७० धावांची भागिदारी केली. या जोडीचा मैदानावर जम बसलेला असतानाच पृथ्वी शॉ २९ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला शुभमन गिलही ३१ धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालरा दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. मनजोत कालराने दणकेबाज नाबाद १०१ धावा केल्या. ८ चौकार आणि ३ खणखणीत षटकार लगावत मनजोतने ही शतकी खेळी केली. तर हार्विकने त्याला जबरदस्त साथ देत पाच चौकाराच्या जोरावर ४७ धावा केल्या. भारताने आठ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करू दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल सदरलँडला १९, परम उप्पलला ३४, कर्णधार जेसन सांघला १३, नाथन मॅक्स्वीनीला १९, जॅक एडवर्डस २८ आणि मॅक्स ब्रायंटला १४ धावांवर बाद केले. जोनाथन मेर्लोने सर्वाधिक ७६ धावा केल्या, त्याला अनुकूल रॉयने बाद केले. तर जोनाथन नंतर मैदानावर उतरलेला जॅक इवान्स अवघी एक धाव करून तंबूत परतला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या ३२ धावा असताना त्यांचा पहिला बळी घेतला. त्यानंतर ५२ धावा असताना ऑस्ट्रेलियाला दुसरा आणि ५९ धावा असताना तिसरा झटका दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सावध पवित्रा घेत खेळायला सुरुवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाजी पुढे त्यांचा टीकाव लागला नाही. भारताकडून ईशान पोरेल, शिवा सिंह, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिवम मावीने एक बळी घेतला.