स्पॉटलाईट: मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

शिक्षणाची भाषा कोणती असावी यावर आपल्याकडे गेली अनेक वर्ष विचारमंथन सुरू आहे. केवळ समाजातच नव्हे तर घराघरांत यावर चर्चा सुरू आहे. चर्चा कसली वाद विवादच म्हणा कारण आईवडील, नातेवाईक, शेजारीपाजारी या सर्वांमध्ये याबाबत मतभिन्नता आढळते. शिक्षणासाठी कोणते माध्यम वापरावे याबाबत तर्कशास्त्र वापरले जात नसल्याने मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीयांचा गोंधळ उडतो. विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळा जशा वाढू लागल्या तसा हा गोंधळ जास्त होऊ लागला. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या झगमगाटाला भुलून सर्वसामान्य माणूसही आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करू लागला.

पूर्वी शहरी भागापूरते असणारे हे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब, कष्टकरी पालक कर्ज काढून उधार उसनवारी करून लाखो रुपयांच्या देणग्या भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करीत आहेत. मुळात इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यम शिक्षण म्हणून निवडणे यात पालकांची गल्लत होते. इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यम निवडणे खरेच गरजेचे आहे का? इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीतूनच घेणे योग्य आहे का? याचा विचार पालक करत नाहीत. मातृभाषेतून शिक्षण घेऊनही चांगले इंग्रजी शिकता येते हेच पालक विसरत चालले आहे. मातृभाषेतून शिक्षण हीच शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा आहे. ती भाषा मुलाला तो आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळते.

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलाची मानसिक वाढ परिपूर्ण होते कारण ते मूल ज्या वातावरणाचा भाग आहे त्या वातावरणाचे प्रतिबिंब त्याला मातृभाषेत दिसते त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हीच शिकण्याची आदर्श पद्धत आहे. सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांची रुजवन फक्त मातृभाषेतूनच होऊ शकते. इंग्रजी माध्यमाचा विचार केला तर इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध होईल असे पालकांना वाटते म्हणून पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालत असतील असे जरी मान्य केले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकलेले सर्वच मुले यशस्वी होतात असेही नाही. उलट आज जे उच्चपदावर पोहचलेले मान्यवर आहेत मग ते डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक असोत की शास्त्रज्ञ, उद्योजक, नेते, अभिनेते सर्वच मराठी भाषेतून शिकलेले आहेत.

आयएएस,आयपीएस, आयएफएस यांची जर यादी पाहिली तर त्यातील ९५ टक्के अधिकाऱ्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले आहे. मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीच आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, चीन, जपान, रशिया यासारख्या प्रगत देशातही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. या देशातील पालक जाणीवपूर्वक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देतात. फिनलँड सारखा देश की ज्या देशाच्या शिक्षण पद्धतीचे अनुकरण प्रगत राष्ट्रही करतात त्या देशातही मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.

मातृभाषेतूनच मुलांचा भावनिक व सामाजिक विकास होऊ शकतो. सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची पेरणी फक्त मातृभाषेतूनच होऊ शकते. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुलांना इंग्रजीचे डोस पाजले तर इथला मराठी भाषेचा समृद्ध ठेवा लुप्त होईल. मुलांमध्ये, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या संस्काराचे रोपण करायला मातृभाषाच कामी येईल. शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. जितक्या सहजतेने मूल मातृभाषेतून शिकते तितक्या सहजतेने इंग्रजीतून शिकत नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here