मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर रविवारी मेगाब्लॉक.
✒नीलम खरात मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.3 अप्रैल:- मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी लाईनवर देखभाल, दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली येथे लोकल थांबा नसेल. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकादरम्यान लोकल सेवा सुरू असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असून दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे ते कल्याण दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत मुलुंड ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ठाणे, दिवा, डोंबिवली या दरम्यान थांबतील. मात्र, ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत.
पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन नेरुल /बेलापुर – खारकोपर हार्बर मार्गासहित सकाळी 10.03 ते दुपारी 4.01 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येतील. पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येतील.
वसई रोड ते विरार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत या ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल.
अशी माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली.