सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड मार्फत बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाभार्थ्यांना रिक्षा व यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) डॉ. रविंद्र शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्री देवकाते , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, विजयकुमार कुलकर्णी,
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जी. एस. हरळय्या, तसेच विविध बँक व उद्योग केंद्रांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा उद्योग केंद्र, रायगडसाठी प्राप्त 744 प्रकरणांपैकी 755 प्रकरणांना बँकेकडून मंजुरी मिळाली असून उद्दिष्टांच्या 100% हून अधिक पूर्तता करण्यात आली आहे. यशस्वी नियोजन व मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तसेच बीज भांडवल कर्ज योजनेतील उद्दिष्टेही 100% पूर्ण करण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत ऑटो रिक्षा व्यवसायासाठी विरेद्र देवराम टिके, वैभव नामदेव जिते आणि पांडुरंग रामा जायनाखवा (रा. अलिबाग) यांना स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र, अलिबाग शाखेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत श्रीमती. मुग्धा महेंद्र तुपे यांना बँक ऑफ बडोदा, अलिबाग शाखेकडून अनुदानाच्या सहाय्याने सोडा वॉटर व्यवसायासाठी यंत्रसामग्री प्रदान करण्यात आली.
राज्य शासनाच्या या योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असून, त्यांना आर्थिक स्थैर्य व विकासाच्या दिशेने मार्गदर्शन मिळत आहे.