दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी दि.११ जानेवारी १९९८ रोजी डॉ.मदन कटारिया यांनी साजरा केला होता. दिवसभरात शेकडो देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत माहिती देणे व जागरूक करणे होय.
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे
मोबा. ७४१४९८३३३९
३ एप्रिल, गडचिरोली: हसणे आपल्या शरीरात आणि मनामध्ये उत्तेजन आणते आणि मनापासून हसणे एखाद्या औषधापेक्षा काही कमी नाही. हे एक उत्तम शक्तिवर्धक म्हणून कार्य करते. म्हणूनच आज आपल्या धावपळीच्या जीवनातील ताण तणावातून मुक्त होण्यासाठी विविध ठिकाणी ह्युमर क्लब सुरू केले आहेत. दरवर्षी जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन पाळला जातो. या दिवशी आनंद आणि आनंदाची सकारात्मक भावना प्रोत्साहित केली जाते.
आपल्या शरीराच्या निरामयतेसाठीही हसण्याचे महत्त्व आहे. स्मितहास्य आपल्या मनावरील खुप मोठा ताण कमी करू शकतो. आनंदाची छानदार शोभीवंत झालर म्हणजे हास्य आहे. हसण्याने असाध्यातील असाध्य विकार दूर पळतात. हे कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भाव काळात सिद्ध झाले आहे. चरमसीमेवर पोचलेल्या रूग्णांना कोरोना केअर सेंटरमधील कर्तव्यनिष्ठ आरोग्यकर्मचाऱ्यांनी आनंदवर्धक व हास्य गोष्टी ऐकवल्या होत्या. त्यामुळे बरेचसे रूग्ण मृत्युच्या जबड्यातून सुटले, हे आश्चर्यच नाही का? म्हणून स्वतः हसा व इतरांनी हसवत रहा. हेच मानवी जीवनातील सुवर्ण क्षण आणि जन्माचे सार्थक समजा.
हा एक अतिशय सुंदर, सामर्थ्यवान आणि सकारात्मक भावनांचा उत्कर्ष करण्यासाठी समर्पित दिवस आहे. तो उत्कर्ष हास्यामुळे टिकून राहतो. हा ताजी हवेचा श्वास आहे. कठिण परिस्थितित असताना आपल्या चिंतेपासून दूर जाण्यासाठी हसण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हास्य खरेच एक उत्तम औषध आहे. हास्याचे महत्त्व प्रचंड आश्चर्यकारक आहे. आनंदी असणे निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. हिंसा, तणाव, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती, खराब अर्थव्यवस्था आणि ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींमध्ये आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुहास्यवदन असणे होय. जेव्हा लोक आनंदी आणि निरोगी असतात तेव्हा ते जागतिक शांततेत महत्त्वपूर्ण योगदानही देत असतात.
जागतिक हास्य दिन किंवा वर्ल्ड लाफ्टर डे दरवर्षी मे महिन्यात साजरा केला जातो. त्याची तारीख बदलते कारण हा दिवस मेमध्ये पडणार्या पहिल्या रविवारी आयोजित केला गेला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने अनेक लोकांच्या चेहर्यावरील हास्य मावळले आहे. अशा परिस्थितीत लाफ्टर डेच्या बहाण्याने चेहर्यावर थोडे हास्य आणण्याचा प्रयत्न असतो. स्वत: हसा, तसेच इतरांना हसवा. हा एक दिवस लक्षातही येत नाही, म्हणून तो चांगला आठवडाभर पाळला जावा. या दिवसाची सुरुवात भारतातूनच तेही मुंबईत झाली आहे. याचे श्रेय लाफ्टर योग चळवळीचे संस्थापक डॉ.मदन कटारिया यांना जाते. त्यांनीच दि.११ जानेवारी १९९८ रोजी मुंबईत प्रथमच जागतिक हास्य दिन साजरा केला. ते विनोदी योग चळवळीचे संस्थापक होते. हा उत्सव साजरा करण्यामागील सर्वात मोठा हेतू म्हणजे समाजातील वाढते तणाव कमी करणे हा आहे. रोजच्या नित्यकर्मामुळे लोकांच्या आयुष्यात हसण्याचे प्रमाण खूप कमी होत आहे. अशा परिस्थितीत विचार केला गेला, की असे काहीतरी का करू नये?
हे लोकप्रिय लेख आपण वाचलेत का?
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर….शेतात “सौर ऊर्जा कुंपण” उभारण्यासाठी मिळणार इतके अनुदान
- दादासाहेब फाळके जयंतीनिम्मित: राष्ट्रीय चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके
- आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन विशेष: मानवात मलेरियाचे कसे होते संक्रमण?
ज्यासाठी लोकांनी एकमेकांशी बोलावे आणि थोडावेळ हसत रहावे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या सभोवतालचे जग बदलते. बिनशर्त हसणे आपल्याला आतून बरे होण्याची शक्ती देते. जेव्हा आपल्याला आतून चांगले वाटते तेव्हा ते केवळ बाह्य जगाचा संपूर्ण दृष्टीकोन बदलतो. हसणे हा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कल्याणाचा सर्वात सोपा उपाय होय. यामुळे काहीच अपाय होत नाही, परंतु हास्यमुळे आपल्याला चांगले वाटते. आपले नाते मजबूत करण्यासाठी आणि जेव्हा आपण अस्वस्थ असतो तेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीत हास्य हे आपल्या मदतीला असते.
ते आपली चिंता कमी करते आणि ऊर्जा वाढवते. म्हणून हास्य हे उत्तम औषध आहे, जे प्रत्येक परिस्थितीत उपयुक्त ठरते. हास्य संपूर्ण शरीराला आराम देण्याचे कार्य करते व ते आपल्याला सर्व ताण तणावापासून दूर ठेवते, जे आपल्या स्नायूंना सुमारे ४५ मिनिटे विश्रांती देते. बोलताना जेवढे ऑक्सिजन घेतो, त्यापेक्षा सहापट जास्त ऑक्सिजन आपण हसण्यामधून घेतो. अशा प्रकारे शरीराला ऑक्सिजनची चांगली मात्रा मिळते. हसण्याने शरीरात मेलाटोनिन तयार होते, मेंदूने सोडलेल्या या हार्मोनमुळे चांगली झोप येते. जेव्हा आपण हसणे सुरू करतो तेव्हा शरीरात रक्ताभिसरण तीव्र होते. तणावात असताना जर आपण हसण्याचा प्रयत्न केल्यास दुःखही कमी होताना दिसते. आपली स्मरणशक्ती कालांतराने कमकुवत होत जाते, ती सुधारण्याचा एक मार्ग जो म्हणजे हास्य आहे. ते आपले मन मजबूत आणि स्मरणशक्ती चांगली ठेवते.
हे आहेत हसण्याचे काही फायदे- हसण्यामुळे शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळते. ब्लड प्रेशर कमी होऊन दुःख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. शरीराची रोगप्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. ज्यांना हृदयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. आपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. हसत राहिल्याने चांगले विचार येतात व वागणे सकारात्मक राहते. सदा हसरा चेहरा व हसविणारी अभिव्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटत असते. खुदूखुदू हसणे हे आनंदाच्या डोहातील आनंदतरंग होत.
आता तर योगा, प्राणायम या सोबतच हास्याचा सुद्धा समावेश योगांमध्ये करण्यात आला आहे. जसे की पैशात पैसा ओतला तर तो वाढतो, तसे ज्ञानदानाने ज्ञान आणि हास्यदानाने निरामय आरोग्यात चक्रवाढ व्याज दराने वृद्धी होते. दरम्यान आज जगभरात हास्ययोग घेतला जातो. अनेक ठिकाणी हास्ययोगाचे विशेष वर्ग चालतात. हास्ययोग लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणीही करू शकतो. अतिशय कमी खर्चिक असा हा योगाचा प्रकार असल्यामुळे अनेकजण या योगाकडे वळले आहेत.
हास्ययोगा केल्याने नकारात्मक विचार दूर जाऊन सकारात्मकतेचा विचार मनात येतो. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. हास्ययोगा केल्याने निखळ आनंद घेता येतो. दररोज १५ मिनिटापर्यंत हा योग करावा, असे तज्ञ सांगतात. विश्वातील काही देशात ५ ऑक्टोबरला जागतिक हास्य दिवस साजरा केला जातो. याच्यापाठीमागे एकच हेतू आहे हसा आणि दुसर्यांना हसवत राहा. आरोग्याच्या दृष्टीने हसणे किती उपयोगी आहे, हे वैद्यकीय शास्त्राने देखील मान्य केले आहे, हे येथे विशेष उल्लेखनीय!
!! हास्य दिन सप्ताहाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!