राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण १६ हजार ३३९ प्रकरणे निकाली १३ कोटी ३८ लाख ७२ हजार १५६ रूपयाची तडजोड रक्कम वसूल

विवेक काटोलकर

 माणगांव प्रतिनिधी

मो: 77989 23192

माणगांव :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्याचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, या हेतूने आयोजित केलेल्या दि. ३० एप्रिल २०२३ रोजी रायगड जिल्हयात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दालल अशी एकूण १६ हजार ३३९ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री.अमोल अ. शिंदे यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयांत वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एन. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण ८९ हजार ११९ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे १४ हजार ८७५ व प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ४६४ प्रकरणे अशी एकूण १६ हजार ३३९ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याव्दारे पक्षकारांना एकूण १३ कोटी ३८ लाख ७२ हजार १५६ रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. ९ जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला.

रायगड जिल्हयातील लोकन्यायालयात ९ जोडप्यांचा (अलिबाग येथील लोकन्यायालयात १, श्रीवर्धन १, माणगाव २, पेण १, रोहा १, महाड २, पनवेल १ )सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस सावंत व पॅनलवरील सर्व न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २९ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करून सुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलीस अधीक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत व न्यायाधीश तथा सचिव श्री. अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here