साडेतीन हजार मुली बेपत्ता…महाराष्ट्रात बेपत्ता मुलींची संख्या वाढणे अत्यंत चिंताजनक
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779, नागपूर
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरूणी राज्यातुन बेपत्ता झाल्या आहेत ही माहिती राज्य सरकारच्या वेबसाइटवर असलेली महिला व मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे. त्याचप्रमाणे ही बाब अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून सुध्दा प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महिला व मुली बेपत्ता होण्याच्या बाबतीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.महिलांच्या तपासासाठी गृहविभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहीम राबवावी व दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.अशी सुचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली आहे.म्हणजेच महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर महिला आयोगाने अत्यंत चांगली भूमिका घेतल्याचे मी समजतो.
महिला व मुली बेपत्ता होतात ही बाब चिंताजनक आहे यात दुमत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिस यंत्रणा याबाबतीत अत्यंत सतर्कतेने कार्य करीत असते.परंतु माझ्या मते याबाबतीत सामाजिक संघटनांनी व सर्वसामान्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील मुली बेपत्ता होणे किंवा अपहरण सारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.यावर अवश्य अंकुश लावण्यास मोठी मदत होईल.
https://mediavartanews.com/2023/05/18/the-kerala-story-movie-latest-news-update/
मुली बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असू शकतात व आहे.परंतु यावर मुलींच्या पालकांनी, नातेवाईकांची व शेजाऱ्यांची करडी नजर असायला हवी व परस्परांना माहिती द्यायला हवी.यात मुख्यत्वे करून पालकांचे सहकार्य अती आवश्यक असते.तेव्हाच बेपत्ता या शब्दावर अंकुश लागु शकतो. यामुळे पोलिस प्रशासनाला बेपत्ता मुलींचा शोध लावण्यास सुलभता मिळेल.मुली बेपत्ता होण्याची अनेक कारणे पुढे आली आहेत. प्रेमप्रकरण, लग्नाचे आमिष, नौकरी, फसवणूक करून मुलींची दिशाभूल केली जात असल्याचे लक्षात येते. बेपत्ता मुलींवर अत्याचार करून मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय किंवा लैंगिक शोषण यासारखे प्रकार अपहरण करते करीत असल्याचे लक्षात आले आहे.अशा अनेक कारणांमुळे शहरातुन व ग्रामीण भागातुन मुली बेपत्ता होतात.
मुलगी सज्ञान नसल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार पालकांकडून दाखल करण्यात येते. मुलगी सज्ञान असली तरी खबरदारी म्हणून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली जाते अशी माहिती सरकारी सुत्रांकडून समजते.त्यापध्दतीने पोलिस यंत्रणा तत्परतेने कारवाई करीत असते आणि अनेक बेपत्ता मुलींना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम पोलिस प्रशासन करीत असतो.परंतु पालकांचे सुध्दा कर्तव्य बनते की मुलगी घराबाहेर जात असतांना ती कुठे जात आहे, कशासाठी जात आहे, केव्हा येणार व किती वेळात घरी वापस येणार आहे याची संपूर्ण सटीक माहिती मुलींनी पालकांना देणे गरजेचे आहे.कारण काळ बदललेला आहे त्यानुसारच मुलींनी पालकांसोबत समन्वय साधला पाहिजे.
https://mediavartanews.com/2023/06/03/do-we-really-respect-woman-in-india/
अत्याधुनिक युगात आपल्या जवळ मोबाईल सारखी सुविधा उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करून मुलींनी व पालकांनी समन्वय ठेवणे गरजेचे आहे.गरज पडल्यास पोलिस विभागाची मदत घ्यायला हरकत नाही.कारण मुलींना मोठे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यातुन मानवी तस्करी, लैंगिक शोषण, हत्या इत्यादी घटना उद्भभवू शकतात. याकरीता मुलींनी सुध्दा सतर्कता बाळगावी असे मला वाटते.कारण महाराष्ट्रातुन मुली बेपत्ता होण्याची जी आकडेवारी सामोरं आली आहे ती अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.