5 वर्षात रायगड जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात तब्बल 36 हजार 117 प्रसुती
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सरकारी रूग्णालयाचे नाव काढलं तरी नाकं मुरडण्याचे दिवस आता संपले आहेत. कारण सरकारी रूग्णालयासंदर्भात एक दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गरोदर माताही आता प्रसुतीसाठी सरकारी रूग्णालयांना पसंती देवू लागल्या आहेत. मागील 5 वर्षात रायगड जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात तब्बल 36 हजार 117 इतक्या प्रसुती झाल्या आहेत.
एकीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. खाजगी रूग्णालयाचे दरपत्रक सामान्य माणसांना भोवळ आणणारे आहे. वाढत्या महागाईमुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. खासगी रुगणालयामध्ये प्रसूती करण्यासाठी लाखो रूपये खर्च येत असल्यामुळे गरोदर मातांची पावले सरकारी रूग्णालयाकडे वळू लागली आहे. दुसरीकडे सरकारी रूग्णालयात प्रसुती मुळे मिळणारे लाभ आणि सुविधा गरोदर मातांना आकर्षित करीत आहेत.
महिला गर्भवती झाल्यानंतर प्रसुतीसाठी खासगी किंवा सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. मात्र खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेत असतात. त्यामुळे गरिबांना ते परवडत नाही. सर्वसामान्य, कष्टकरी व मध्यवर्गीय विविध शस्त्रक्रियांसाठी, गरोदर माता आता सरकारी रूग्णालयाकडे वळू लागल्या आहेत. एकीकडे इतर जिल्ह्यात खासगीसह जिल्हा रूग्णालयात सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत आहे.
मागील 5 वर्षात सरकारी रूग्णालयांचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकेकाळी दुर्लक्षित आणि केवळ गरीबांची रूग्णालये म्हणून पाहिल्या जाणारया रूग्णालयात वेगवेगळया सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अत्याधुनिक यंत्र सामुग्री आरोग्य विभाग तसेच वेगवेगळया कंपन्यांचया सीएसआर निधीतून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सर्वाधिक प्रसुती जिल्हा रूग्णालयात होतात. मागील 5 वर्षातील सरकारी रूग्णालयात झालेल्या प्रसुतींच्या आकडेवारीवर नजर टाकली दरवर्षीरूग्णालयात साडेसात हजार प्रसुती होत असतात. हा आलेख दरवर्षी वर सरकताना पहायला मिळतो.
सरकारी रूग्णालयात सुविधा
सरकारी रूग्णालयात तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सेस व इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी कायम स्वरूपी डॉक्टर उपलब्ध नाही तेथे तात्पुरत्या किंवा कंत्राटी डॉक्टर्सची नियुक्ती केली जाते. सरकारी रूग्णालयात प्रसुती केल्यास जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो. वेळोवेळी आवश्यकतेनुसार संदर्भसेवा मिळते. प्रसुतीनंतर गरोदर महिलेस घरपोच सेवा मिळते. सर्व औषधोपचार, चाचण्या मोफत होत असतात. आहार मोफत मिळतो. कुटुंब नियोजन सेवांचा लाभ मिळतो. बालकाचे आणि मातेचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी स्वतंत्र अद्यावत कक्ष असून त्याचा बालजिवीत्व आणि सुरक्षित मातृत्वासाठी उपयोग होतो. प्रतिबंधात्मक सेवेत बालकांस प्राथमिक लसीकरण करूनच सोडले जाते.
———————————–
598 बालके झाली गुटगुटीत
कमी वजनाच्या बालकांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करून त्यांना सुदृढ बनवण्याचे काम रायगडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरात 598 मुलांना गुटगुटीत करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र प्रसुती कक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यातून गरोदर माता प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेली बाळे चांगल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली जातात. जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्ष ही उपलब्ध आहे. या ठिकाणी डॉक्टर यांच्याकडून बालकांवर योग्य उपचार करून ते सुदृढ करण्याचा प्रयत्न केला जातो.
————————————-
सरकारी रूग्णालयातील प्रसुतीची आकडेवारी
वर्ष प्रसुतींची संख्या
2020 – 21 6487
2021 – 22 6291
2022 – 23 7855
2023 – 24 7646
2024 – 25 7838
———————————————
जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांची संख्या
जिल्हा रूग्णालय 1
उपजिल्हा रूग्णालये 6
ग्रामीण रूग्णालये 8
प्राथमिक आरोग्य केंद्र 52
पालिका रूग्णालये 2