पाऊस थांबल्याने भात पेरणीला सुरुवात!

पाऊस थांबल्याने भात पेरणीला सुरुवात!
यंदा धुळवाफेऐवजी दमट ओल्या मातीत पेरणीचा पर्याय

✍️ दिलीप करकरे
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 7208708456

माणगाव : यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे पावसाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली. सलग पडलेल्या पावसामुळे रानावन आणि माळराने हिरवळीनं नटली असली, तरी यंदा भात पेरणीचा पद्धत थोडी बदलली आहे. पारंपरिकपणे धुळवाफ्यावर होणारी पेरणी यंदा दमट व ओल्या मातीत सुरू झाली आहे.

त्यामुळेच शेतशिवारात पुन्हा एकदा पारंपरिक बैल नांगर दिसू लागले आहेत. हवामान विभागाने १ जून ते ७ जून या कालावधीत उन्हाळी हवामान राहील, त्यानंतर पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. याच दरम्यान, शेतकरी आपल्या शेतात उतरून भात पेरणीची कामं गतीने पार पाडू लागले आहेत.

शेतकऱ्यांनी आधी नांगरणी करून भाताची पेरणी केली. त्यानंतर लाकडी दात्याच्या सहाय्याने ढेकल फोडले जात आहेत व शेवटी कुदळी फिरवून माती सपाट केली जाते. पेरणीची ही पद्धत जुन्या पण ठाम अनुभवांवर आधारित आहे.

यावर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याचा अंदाज आहे. मृग, कोल्हा, आद्रा आणि उंदीर या नक्षत्रांचे वाहन लक्षात घेता या काळात पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात रोपांची रुजवणूक योग्य पद्धतीने होईल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो.

कारण पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास खाचरात पाणी साचते आणि पेरणीला अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर कोंब कुजण्याचीही शक्यता वाढते. यंदाच्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक शेती कामांवर परिणाम झाला आहे. मात्र, शेती ही निसर्गावर आधारित असल्याने बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून पर्याय नाही.

पाऊस खूपच मोठ्या प्रमाणात झाल्यास शेतकऱ्यांना पेरणीसाठी अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आता उघडलेल्या हवामानाचा फायदा घेत शेतकरी जोमाने पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत.