प्रवास प्रवीण जाधवचा, दुष्काळग्रस्त सरडे गाव ते टोकियो ऑलिम्पिक व्हिलेज
प्रवास प्रवीण जाधवचा, दुष्काळग्रस्त सरडे गाव ते टोकियो ऑलिम्पिक व्हिलेज

प्रवास प्रवीण जाधवचा, दुष्काळग्रस्त सरडे गाव ते टोकियो ऑलिम्पिक व्हिलेज

Indian olympian pravin jadhav
प्रवास प्रवीण जाधवचा, दुष्काळग्रस्त सरडे गाव ते टोकियो ऑलिम्पिक व्हिलेज

मनोज कांबळे
मुंबई ब्युरो चीफ
मुंबई,दि.3 जुलै: काही वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ होत अमरावतीचे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र…साताऱ्यातील दुष्काळग्रस्त सरडे गावातून आलेला प्रवीण जाधव हातामध्ये तिरंदाजीचे आधुनिक धनुष्यबाण घेऊन उभा होता. समोर ७० मीटर्सवर निशाणा होता आणि तो निशाणा साधण्याची एकमेव आणि कदाचित आयुष्यातील शेवटची संधी. संधी तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रातून आपलं ऍडमिशन रद्द होण्यापासून वाचवण्याची, संधी आपल्या तिरंदाजी कौशल्याच्या जोरावर आपले आणि गावाकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या आपल्या आई वडिलांचे आयुष्यमान सुधारण्याची…प्रवीणने निशाणा धरला. प्रशिक्षक त्याच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहत होते. प्रवीणने श्वास रोखून धरला..आणि एका पाठोपाठ एक असे पाच तिर सोडले. पाचही तिर निशाण्यावर लागले, प्रवीणने ५० पैकी ४५ पॉईंट्स कमवले आणि आपलं ऍडमिशन पक्क केलं. त्या घटनेपासून प्रवीण जाधवचा तिरंदाजीचा संघर्षयमय प्रवास सुरु झाला जो आजच्या घडीला टोकियो ऑलिम्पिक २०२१ पर्यंत येऊन पोहचला आहे.

सुरुवातीला प्रवीणच्या आई वडिलांची इच्छा होती कि शाळा सोडल्यानंतर प्रवीणने गावाजवळील कपड्यांच्या दुकानात काम करावे. पण प्रवीणला लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड होती. त्याच्या शाळेतील शिक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर भरीव कामगिरी केली आणि त्याच्या जोरावर पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी त्याची निवड झाली. परंतु अपुरी शारीरिक आणि तांत्रिक तयारी यांमुळे धावण्याच्या क्रीडा प्रकारात प्रवीणला फारसे यश मिळाले नाही.

एके दिवशी सहजच अकॅडेमीतील तिरंदाजी केंद्रामध्ये गेला असता प्रवीणने ऊत्सुकतेने धनुष्यबाणाने निशाणा धरला आणि एका पाठोपाठ एक तिर निशाण्यावर मारले. या आधी कधीही तिरंदाजीचा सराव न केलेल्या प्रवीणच तिरंदाजीतील कौशल्य पाहून अकॅडेमीतले प्रशिक्षक अचंबित झाले. तसेच त्याची हातांची लांबी, स्थिरता आणि एकूण शरीरयष्टी तिरंदाजी खेळासाठी जास्त योग्य असल्याने त्यांनी प्रवीणला धावण्याचा क्रीडा प्रकार सोडून तिरंदाजी शिकण्यासाठी अमरावतीला पाठवले. पहिली काही वर्ष प्रवीणचा तिरंदाजीतला प्रवासहि चढ- उताराचा राहिला. खराब कामगिरीमुळे अकॅडेमीतून बाहेर पडण्यापासून ते राष्ट्रीय पातळीवर रजत पदक जिंकण्या दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रवीणच्या मेहनतीमध्ये मात्र कुठेही खंड पडला नाही. पुढे २०१६ मध्ये आशिया कप सांघिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीणने कांस्य पदक पटकावले. २०१९ मध्ये प्रवीणने आपले साथीदार अंतनु दास आणि तरुणदीप राय सोबत जवळपास चौदा वर्षांनंतर भारताला जागतिक तिरंदाजी चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यांमध्ये पोहचवले.

प्रवीण जाधवसाठी तिरंदाजी हा फक्त एक खेळ नसून आपल्या दुष्काळग्रस्त गावातील संघर्षमय परिस्थतीवर मात करण्याचं एक साधन आहे. २०१७ मध्ये प्रवीणला भारतीय सैन्यामध्ये हवालदार पद बहाल करण्यात आलं. प्रवीणने आपल्या आई वडिलांसाठी आता त्यांचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरु करून दिला आहे. तिरंदाजीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जगभर फिरणारा प्रवीण दर दिवशी गावाकडे आठवणीने न चुकता फोन करतो. महत्त्वाच्या स्पर्धेआधी घरच्यांशी बोलल्यावर मला मनाची एकाग्रता जास्त वाढवण्यास मदत होते असं प्रवीण सांगतो. २०२१ च्या पॅरिस तिरंदाजी वर्ल्ड कपच्या वेळेस मात्र त्याला एक अडचणीला सामोरं जाव लागलं होत. स्पर्धेच्या एक आठवड्या आधीपासून प्रवीणचा घरच्यांशी संपर्कच होत नव्हता, अश्या चिंतातुर परिस्थितीमध्ये प्रवीणने स्पर्धा खेळली. स्पर्धा संपल्यानंतर त्याला कळले कि मुसळधार पावसामुळे त्याच्या गावातील वीज आठवड्यापासून बंद होती आणि त्यामुळे त्याचा आई वडिलांशी संपर्क होऊ शकला नाही.

संकटांच्या वेळी तुमच्यामध्ये एक सुप्त मानसिक शक्ती जागृत होते, त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता असं प्रवीण जाधवने एकदा प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं होत. आपल्या कौशल्याचा आणि कधीही हार न मानण्याच्या स्वभावाच्या जोरावर या वर्षीच्या टोकियो २०२१ ऑलिम्पिक मध्ये भारताला तिरंदाजीमधील पाहिलं पदक मिळवून देण्यासाठी प्रवीण जाधवला भारतीय क्रीडाप्रेमी सर्व स्तरावरून शुभेच्छा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here