रायगडला डेंग्यूचा धोका
जिल्हयात 53 संशयीत डेंग्यू रुग्ण
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. डासांमुळे डेंग्यूची लागण होण्याची भिती जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील अलिबागसह नऊ तालुक्यांमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत 53 संशयीत डेंग्यू रुग्ण आहेत. मे व जूनमध्ये 24 डेंग्यू रुग्ण सापडल्याची माहिती उघड झाली आहे.
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. संक्रमित डास चावल्यास विषाणू त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि यातून डेंग्यूचा संसर्ग होतो. डेंग्यूमुळे पांढऱ्या पेशी कमी होण्याचा धोका कायम असतो. उच्च ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, मळमळ, उलट्या, त्वचेवर पुरळ आणि थकवा ही डेंग्यूची लक्षणे आहेत. सध्या पावसाळी हंगाम सूरू झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले जात आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डांसांपासून मुक्ती मिळावी, यासाठी अनेकजण आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहेत. तरीदेखील सायंकाळी व पहाटेच्या वेळी डासांचे संकट ग्रामीण भागासह शहरी भागात सूरू आहे. या डासांच्या दंशामुळे तापाची साथ वाढली आहे. रुग्णांची तपासणी केली, त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न आहे. रायगड जिल्हयात आतापर्यंत 53 डेंग्यू संशयीत रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पनवेल, अलिबाग, पेण, खालापूर, सुधागड, मुरूड, रोहा, माणगाव या नऊ तालुक्यात डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. डेंग्यू संशयीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्याचे काम सूरू केले आहे. जिल्हयात सध्या मे व जून या कालावधीत 24 डेंग्यूचे रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये दोन मे महिन्यात व 22 जून महिन्यात रुग्ण सापडले आहेत. नागरिकांनी साचलेले पाणी वाहते करावे. परिसर स्वच्छ ठेवावे अशा सुचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
प्रतिबंधात्मक उपायांवर दृष्टीक्षेप
तापाची साथ असल्यास त्वरित वैद्यकिय अधिकारी यांना कळविणे.
जलद ताप सर्वेक्षण करावे.
हिवताप नाही, याची प्रयोगशाळेतून खात्री करणे.
धुर फवारणी करणे.
डासोत्पती स्थाने नष्ट करणे.
मोठ्या पाणी साठ्यामध्ये गप्पी मासे सोडणे.
ॲबेट या आळी नाशकाचा वापर करणे
पाण्याचे साठे दर आठवड्यातून एकदा रिकामे करणे.
परिसर स्वच्छ राखणे.
डास प्रतिबंधक उपाययोजना
उद्रेकग्रस्त गावात उपलब्धतेनुसार धुर फवारणी करणे.
किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करणे.
अळीनाशक फवारणी करणे.
डासोत्पत्ती स्थानांत गप्पीमासे सोडणे.
डेंग्यू संशयत रुग्णांवर दृष्टीक्षेप
तालुका / महानगरपालिका- नमुने – पॉझिटीव्ह
पनवेल महानगर पालिका – 1376- 38
उरण – 58- 02
पनवेल ग्रामीण – 231- 02
खालापूर – 44- 01
सुधागड – 26- 01
अलिबाग – 66- 04
मुरूड – 143- 02
रोहा – 28- 01
माणगाव – 100- 02
–
एकूण – 2072- 53
–
सध्या जिल्हयात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डेंग्यूला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. डेंग्यूमुळे पेशी कमी होतात. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पेशींची कमतरता कमी भासू नये, यासाठी जिल्हा रुग्णालयात पुरेसा पेशींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. यावर्षी मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीत 24 रुग्ण सापडले आहेत. गतवर्षी याच कालावधीत 128 रुग्ण सापडले होते. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी डेंग्युच्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे.
डॉ. निशीकांत पाटील
जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात 53 रुग्ण इलिसा पॉझिटीव्ह सापडले आहेत. सध्या डेंग्यू संशयीत रुग्ण आहेत. तपासणी केल्यावर ते डेंग्यू बाधीत रुग्ण असल्याचे स्पष्ट होईल.
अश्वीनी सकपाल- प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी,
तथा तालुका आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद