सेवानिवृत्त जवाननायक विजय गोळे यांचे पोलादपूरमध्ये जल्लोषात स्वागत

सेवानिवृत्त जवाननायक विजय गोळे यांचे पोलादपूरमध्ये जल्लोषात स्वागत

राष्ट्रभक्तीने भारले वातावरण

सैनिक भवन विश्रांतीगृह सुसज्ज भवन लवकरच : जि.प सदस्य श्री चंद्रकांत कळंबे

सिद्धेश पवार,
तालुका प्रतिनिधी पोलादपूर
8482851532

पोलादपूर ,: पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीतील सुपुत्र आणि भारतीय लष्करात दीर्घकाळ सेवा बजावलेले जवाननायक श्री विजय लक्ष्मण गोळे यांचा सेवानिवृत्तीनंतर गावात जल्लोषात आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, लखनऊ, सिक्कीम आणि उरी या संवेदनशील भागांत अभिमानाने लष्करी सेवा बजावणाऱ्या विजय गोळे यांचा गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सत्कार करत त्यांचा गौरव केला.

या स्वागत मिरवणुकीची सुरुवात लोहार माळ नाका येथून झाली. ढोल-ताशा, लेझीम, ताशांच्या गजरात आणि “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” अशा देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामस्थ, महिला, तरुण व लहानग्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत मिरवणुकीस भव्य स्वरूप दिले.

गावात दाखल झाल्यावर विजय गोळे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे दशरथ उतेकर, अनिल भिलारे, माजी सरपंच अनिल पवार, काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित सभेत श्री चंद्रकांत कळंबे यांनी विजय गोळे यांच्या देशसेवेचे गौरवगान करत, “अशा नायकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या पंचक्रोशीतील तरुणांनी देखील लष्करात भरती होऊन देशसेवेचे व्रत घ्यावे,” असे उद्गार काढले. त्यांनी माजी सैनिकांसाठी नामदार भरत गोगावले यांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सैनिक विश्रांतीगृहाचा उल्लेख करत, त्याचे लोकार्पण लवकरच होईल अशी माहिती दिली.

स्वतः नायक विजय गोळे यांनीही आपल्या अनुभवातून बोलताना, “भारतीय लष्करात सेवा देणे ही प्रत्येक तरुणाची अभिमानाची बाब आहे. देशसेवेपेक्षा मोठं कोणतंही कर्तव्य नाही,” असे सांगत उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद मिळाली.

या सोहळ्यामुळे संपूर्ण तुर्भे पंचक्रोशी आणि पोलादपूर परिसरात राष्ट्रभक्तीने भारलेले वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि कृतज्ञता ही नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. विजय गोळे यांचा हा सन्मान संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.