ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी भारतीय संघ उद्यापासून मैदानात उतरणार

57

भारत विरुद्ध इंग्लंड मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी भारतीय संघ उद्यापासून मैदानात उतरणार

मनोज कांबळे

मुंबई दि. ३ ऑगस्ट २०२१: भारत आणि इंग्लंड मधील पाच टेस्ट टेस्ट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून नॉटिंगहॅम येथे सुरुवात होणार आहे. २००७ पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेला इफ्तिखार खान पटौडी ( १९३० – १९४० च्या दशकांत भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांकडून खेळलेले एकमेव क्रिकेट खेळाडू) यांचं नाव दिल गेलं होत. आतापर्यंत झालेल्या चार मालिकांपैकी तीन इंग्लंडने जिंकल्या असून भारताने २००७ सालाची एकमेव मालिका जिंकली आहे. त्यामुळे सध्या टेस्ट रँकिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला हरवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक:

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

कोरोना आणि दुखापतीने भारत – इंग्लंड संघ त्रस्त:

मालिका सुरु होण्याअगोदरच दोन्ही संघ कोरोना आणि खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. भारतीय संघाकडून शुभमंन गिल आणि वॉशिग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने मायदेशी परतावे लागले आहे. तसेच पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू क्वारंटाईनमुळे उशिराने इंग्लंड मध्ये पोहचले आहेत. सरावा दरम्यान चेंडू डोक्याला लागून झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर मयंक अग्रवाल पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. तर दुसरीकडे इंग्लंडचा ऑल राउंडर बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संपूर्ण मालिका खेळू शकणार नाही.

भारत आणि इंग्लंडचा इंग्लंडमध्ये आजवरचा आमनेसामने खेळल्याचा इतिहास:
एकूण सामने – ६२
इंग्लंड विजयी – ३४
भारत विजयी – ७
अनिर्णित – २१
या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होणार असल्याने या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मालिकेत एकूण ६० पॉईंट उपलब्ध असून सामना जिंकणाऱ्यास १२ पॉईंट, टाय झाल्यास ६ पॉईंट आणि अनिर्णित राहिल्यास प्रत्येक संघाला चार पॉईंट्स दिले जातील.

कसोटी सलामीवीर म्हणून आपल्या पहिल्याच इंग्लंड मालिकेत रोहित शर्मा उल्लेखनीय कामगिरी करेल का? त्याच्यासोबत सलामीला कोणत्या भारतीय खेळाडूला संधी मिळेल? पुजारा आपला हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवेल का? विराट कोहलीच्या शतकांचा दुष्काळ ह्या मालीकेमध्ये संपेल का? आणि ऑस्ट्रेलियानंतर हा भारतीय संघ इंग्लंडला त्यांच्याच भूमीतच हरवेल का ? कि भारताला नमवून इंग्लंड भारतामध्ये झालेल्या आपल्या पराभवाचा बदला घेईल? यासारख्या असंख्य प्रश्नाची उत्तर या कसोटी मालिकेमध्ये क्रिकेट प्रेमींना मिळणार आहे.