कार्यकर्त्यांनो जिद्दीने कामाला लागा; जयंत पाटील यांचे आवाहन

35

कार्यकर्त्यांनो जिद्दीने कामाला लागा; जयंत पाटील यांचे आवाहन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: :- शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना शुन्य बनविण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. मतदान केंद्रस्तरावर काम करून मतदारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतर्फे आपण लढणार आहोत. जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राहिल, या दृष्टीने मोठ्या जिद्दीने, चिकाटीने, मनात चीड ठेवून वेगळ्या तऱ्हेने काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा चिटणीस मंडळ, नवनिर्वाचित पदाधिकारी, बैठक व चर्चासत्राचे आयोजन चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, शंकराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, राजेंद्र कोरडे, अतुल म्हात्रे, प्रदिप नाईक, सुरेश खैरे, शिवानी जंगम, तेजस्वीनी घरत, नारायण घरत, नाना सावंत, , शंकरराव म्हसकर, पी.डी. पाटील, गणेश मढवी आदींसह जिल्ह्यातील तालुका चिटणीस, सभासद, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाची मते आजही कायम आहेत. जिल्ह्यात साडेचार लाख मते आहेत. हे निवडणूकांमध्ये दाखवून दिले आहे. आगामी काळात वेगळा पॅटर्न घेऊन काम करण्याचा मानस आहे. ग्रुप व बुथ स्तरावर मतदारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साडेचार हजारहून अधिक पदे निवडली आहेत. पक्षाने प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाचे महत्व तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. महिला आघाडीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

रायगड जिल्ह्यातील तालुका चिटणीस यांच्याकडून तालुकास्तरावर कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यांनी केलेल्या कामांसह बुथ व घरस्तरावर केलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. अपूर्ण कामे आगामी काळात तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केल्या.