आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न

30

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न

कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे परिपत्रक 2024 मध्ये काढले होते. परंतु, एक वर्षे होऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचा फटका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात बसला आहे. आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा सुरु करण्यात आला आहे. अनेकांना नोटीसा बजावून वेतन थकविण्याची धमकी दिली जात असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आरोग्य व शासनाच्या आरोग्य विभागात अपुरे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत होता. त्यामुळे आरोग्य विभागाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी नेमण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वैद्यकिय अधिकाऱ्यापासून परिचारिका, आरोग्य सेवक अशी एकूण 71 पदे भरण्यात आली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न केला. तुटपुंज्या मानधनावर गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यांचे समायोजन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अखेर समायोजन करण्यासाठी 14 मार्च 2024 मध्ये परिपत्रक काढण्यात आले. वेगवेगळ्या विभागाची लागणारी परवानगीदेखील घेण्यात आली. परंतु समायोजनचे गाजर दाखवत ही प्रक्रीया थांबविण्यात आली. परिपत्रक काढून एक वर्षे होत आले तरीदेखील समायोजन केले नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19ऑगस्टपासून बेमुदत संप सुरु केला. संप सुरु होऊन पंधरा दिवस होत आली आहेत. मात्र, प्रशासनासह सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवेवर होऊ लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभागात काम करणाऱ्या नियमीत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा वेळेवर पुरवताना या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनासह आयुक्तांनी कारवाईचा बडगा सुरु केला आहे. संपात सहभागी होणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कामावर हजर व्हा अन्यथा वेतन थकविले जाईल. तुमच्या विरोधात कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले असल्याचे आंदोलक म्हणाले. वेगवेगळ्या पध्दतीने कर्मचाऱ्यांचा संप रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरु राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या संपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, आंदोलन मोडीत काढण्यासाठी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यांना नोटीसा देऊन धमकावले जात आहे.

विकास धुमाळ
अध्यक्ष
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना, रायगड