ड्रग्ज देऊन केले १५ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण
नागपूर :- मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड शानू अन्सारीच्या भावाने दोन साथीदारांच्या मदतीने १५ वर्षीय प्रेयसीचे ड्रग्स देऊन अपहरण केले. तिला दोन दिवसांनी शहरात आणून सोडले. ती नशेच्या धुंदीतच तहसील पोलिस ठाण्यात आली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
मोहम्मद आफाक ऊर्फ मोहम्मद सलमान मोहम्मद इसराईल अन्सारी (वय २५, रा. मोमीनपुरा असे अटकेतील युवकाचे नाव आहे. पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) नवव्या वर्गात शिकते. आफाक हा तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्यामुळे तिची आफाकशी ओळख झाली. गांजा आणि ड्रग्स विक्रीशी नाते असलेल्या शानूमुळे आफाकही गुन्हेगारी जगताकडे वळला होता. त्याने सोनमला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दोघांच्या वारंवार भेटी होत होत्या. त्याने सोनमला लग्नाचे आमिष दिल्याने ती त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार होती. २८ सप्टेंबरला पीडित मुलगी कामानिमित्त जात होती. तिच्या मैत्रिणीने तिला आफाक याने बोलाविल्याचा निरोप दिला. दोघीही चौकात गेल्या. तेथे आफाक उभा होता. त्याने दोघींनाही कारमध्ये बसविले. कारमध्ये दोन युवक बसलेले होते. सोनमला रजनीगंधा पुडीमध्ये ड्रग्स खायला दिला. ती खाताच मुलगी बेशुद्ध झाली.
त्यानंतर आफाक तिला घेऊन गेला. दोन दिवसानंतर त्याने तिला परत तिच्या घराजवळ आणून सोडले. नातेवाइकाने मुलीसह पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आफाक याला अटक केली. तो मुलीला घेऊन कोठे व कशासाठी गेला होता याचा तपास पोलिस करीत आहेत. आफाक हा कोठे घेऊन गेला होता हे मुलीलाही आठवत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तहसील पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पी.पी. राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.