ऋतुराज गायकवाड….पिंपरी-चिंचवड मधून भारतासाठी खेळणारा पहिला खेळाडू. आता गाजवतोय आयपीएल
सिद्धांत
मुंबई दि. ३ ऑक्टोबर २०२१: २००३ सालचा टीव्हीएस कप. ३ नोव्हेंबरला न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया मधील एकदिवसीय सामना बघण्यासाठी एक सहा वर्षाचा एक मुलगा पुण्यातील नेहरू स्टेडियमवर गेला होता. तिथे त्याने न्यूझीलँडच्या ब्रॅंडन मॅक्युल्लमला ४७ चेंडूत ५१ धावांची खेळी करताना पाहिलं आणि क्रिकेट त्याच्या डोक्यात शिरलं. तो मुलगा २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड मधून भारतासाठी खेळणारा पहिला खेळाडू ठरला. अन कालच्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान विरुद्ध खेळताना त्याने खणखणीत शतक ठोकलं…बरोबर ओळखलंत. त्या सहा वर्षाच्या मुलाचे नाव होतं… ऋतुराज दशरथ गायकवाड.
ऋतुराज गायकवाड….पिंपरी-चिंचवड मधून भारतासाठी खेळणारा पहिला खेळाडू
३१ जानेवारी १९९७ रोजी ऋतुराज गायकवाडचा पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे जन्म झाला. ऋतुराजचे वडील डीआरडीओ मध्ये ऑफिसर होते तर आई म्युनिसिपल शाळेतील शिक्षक. वयाच्या सहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला लागलेल्या ऋतुराज गायकवाडने ११ व्या वर्षी पुण्यातील वेंगसकर अकॅडेमी मध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्या टॅलेंटच्या जोरावर त्याची लवकरच महाराष्ट्राच्या अंडर १४ आणि अंडर १६ संघात निवड झाली.
पुढे अंडर १९ संघातून खेळायला लागल्यावर ऋतुराजने एकापेक्षा एक विक्रमांचा धडाका सुरु केला. २०१४-१५ सालच्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये फक्त सहा सामन्यांमध्ये ३ शतकं आणि १ अर्धशतकासह ८२६ धावा बनविल्या होत्या. महाराष्ट्र इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये एक तिहेरी शतक मारलं. या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजची २०१६-१७ साली महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. पुढे २०१८ -१९ च्या डोमेस्टिक सिझनमध्ये त्याने ८२१ धावा करत आपला खेळ अधिक उंचावला.
२०१९ मध्ये ऋतुराज गायकवाडची वेस्टइंडिज आणि श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली. पुढच्या आठ सामन्यात ऋतुराजच्या धावा होत्या – १८७*, १२५*, ८४, ७४, ३, ८५, २०, ९७. ऍव्हरेज ११३.
ऋतुराज गायकवाड – लढाऊ वृत्तीचा चाणाक्ष क्रिकेटर
राहुल द्रविडनी एकदा ऋतुराज गायकवाडला क्रिकेट कसा एक माईंडगेम आहे, हे समजावून सांगितलं होतं. ऋतुराज गायकवाडमधील लढाऊवृत्ती हि त्याच सशक्त माईंडसेट मुळे उभारली असावी. त्याची दोन उदाहरण रणजी आणि आयपीएल मध्ये पाहावयास मिळाली.
२०१६-१७ साली वयाच्या १९ व्या वर्षी त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. परंतु झारखंड विरुद्धच्या मॅच मध्ये वरून ऍरॉनचा बाउन्सर त्याच्या बोटांवर आदळला आणि त्या दुखापतीमुळे त्याला पुढच्या पूर्ण सिझनला मुकावं लागलं. पण जेंव्हा दुखापतीतून सावरून जेंव्हा तो परतला तेव्हा महाराष्ट्राचा सर्वोत्तम फलंदाज बनत ऋतुराजने ७ सामन्यात ४४४ धावा बनविल्या.
२०१९ साली आयपीएलमध्ये चेन्नई संघाने ऋतुराजची निवड केली. त्या सिझन मध्ये त्याला मॅच खेळायची संधी मिळाली नाही. २०२० च्या युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या सुरुवातीला तो कोरोनाग्रस्त झाला. २०२० मधील चेन्नई संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. स्पर्धेच्या अखेरच्या टप्यात कोरोनावर मात करून आलेल्या ऋतुराजला मॅच खेळायची संधी मिळाली. त्यादिवसापासून कालपर्यंत ऋतुराज गायकवाडने १८ आयपीएल सामन्यात ५१ च्या सरासरीने ७१२ धावा बनविल्या आहेत. त्यामध्ये ६ अर्धशतकं आणि कालचं झळकवलेल्या पहिल्या शतकाचा समावेश आहे.
ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी
२०२१ च्या आयपीएल मध्ये सर्वात जास्त ५०८ धावा बनवणारा ऋतुराज सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. कालच्या मॅचमध्ये ऋतुराजने शतक मारूनसुद्धा चेन्नई सामना हरली असली तरी चेन्नईला क्वालिफाय राऊंडमध्ये पोहचवण्यात ऋतुराजच मोठं योगदान आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे सारे रन्स बनवताना ऋतुराज फक्त सध्याच्या टी – २० जमान्यात चालणारी आडवी-तिडवी फटकेबाजी करत नाहीये. तर क्रिकेट बॅटिंग गाईड बुकमध्ये शिकवले जाणारे सरळ बॅटने खेळले जाणारे शॉट ऋतुराज खेळतोय, जे क्रिकेटच्या सर्वात कठीण फॉरमॅट टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे ऋतुराज गायकवाड भविष्यात फक्त टी – २० साठीच नाही तर भारतासाठी तिन्ही फॉरमॅट मध्ये उत्तम कामगिरी करेल याबाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात अजिबात शंका नाहीये.