जालन्यात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

54

जालन्यात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

प्रदिप शिंदे प्रतिनिधी

जालना:-  जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे दोन सख्ख्या अल्पवयीन भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. वैष्णव आणि गौरव बहुले अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील ज्ञानेश्वर बहुले आणि त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे रविवारी देखील शेती कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर बहुले यांनी वैष्णव (13) आणि गौरव (10) या मुलांना घरी जाण्यास सांगितले. मुले घरी निघाली पण ती घरी पोहोचलीच नाहीत.

ज्यावेळी मुलांची आई घरी आली त्यावेळी मुले घरी पोहोचली नसल्याचे लक्षात आले, त्यानंतर मुलांची शोधाशोध सुरू झाली.दोन्ही मुलांच्या चपला जवळच असलेल्या शरद जेठमल देसरडा यांच्या शेततळ्यावर असल्याचे दिसले.

यावेळी गावकऱ्यांनी तळ्यामध्ये शोध घेतला असता दोन्ही मुले पाण्यात बेशुद्धावस्थेत सापडली. प्रथम उपचारासाठी त्यांना अंबड येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

तेव्हा तेथील डॉक्टरांनी मुलांना जालन्याला हलविण्यास सांगितले. दरम्यान जालन्याला येईपर्यंत मुलांचा मृत्यू झाला. वैष्णव हा सातव्या वर्गात तर गौरव हा चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हे दुःख व्यक्त करण्यात येत आहे.