पतीने गळा आवळून पत्नीची निर्घृण हत्या.
पतीने गळा आवळून पत्नीची निर्घृण हत्या करीत तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनावही केला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी पहाटेच्या सुमारास घडली
नागपूर:- पतीने गळा आवळून पत्नीची निर्घृण हत्या करीत तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनावही केला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या टेंभरी येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान पाेलिसांनी आराेपी पतीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.
सुषमा दिनेश पाल असे मृत महिलेचे नाव असून, दिनेश छटीलाल पाल रा. चुरहूट, सिंधी मध्य प्रदेश ह. मु. टेंभरी असे आराेपी पतीचे नाव आहे. मृत सुषमा हिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याबाबत आराेपी पतीने पाेलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला हाेता. तपासादरम्यान मृत सुषमाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नसून, तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त हाेताच, या घटनेचे बिंग फुटले. दरम्यान पाेलिसांनी आराेपी दिनेशला ताब्यात घेत त्यास अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम 302, 177, 201 अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे करीत आहेत.