भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकर हैराण, 24 वॉर्डात ‘डॉग व्हॅन’ची गस्त वाढवणार.

मुंबई :- रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे लाखो मुंबईकर हैराण झाले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहे. यापार्श्वभूमीवर कुत्र्यांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास दूर करण्यासाठी पालिकेच्या 24 वॉर्डात डॉग व्हॅनची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडून एका खाजगी संस्थेला कंत्राट देण्यात आलं आहे. यानुसार पालिकेला एका कुत्र्याला पकडण्यासाठी संस्थेला 680 रुपये द्यावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कुत्रे चावल्यामुळे झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी 35 जणांना कुत्रा चावून त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे भटक्या कुत्र्यांबाबत पालिकेकडून सातत्याने तक्रार केली जाते. मात्र मनुष्यबळाअभावी कुत्र्यांचा उपद्रव रोखणे शक्य होत नाही.

त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागाकडून श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण केले जाते. त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात येते. मुंबई महापालिकेने 2014 मध्ये श्वानांची गणना केली होती. यामध्ये 95 हजार 174 भटक्या श्वानांपैकी 25 हजार 935 श्वानांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात आले नव्हते.

यात 14 हजार 674 नर, 11 हजार 261 मादी कुत्र्यांचा समावेश होता. निर्बिजीकरण न केलेली एक मादी ४ पिलांना जन्म देते. त्यामुळे मुंबईत श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांन्वये वर्षाला 30 टक्के श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पालिका श्वान नियंत्रणासाठी उपाययोजना करीत आहे.

दरम्यान, नव्या 7 श्वान वाहनांबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या सर्व उपाययोजनानंतर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे शक्य होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here