चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात जनक्षोभ   

श्याम बसप्पा ठाणेदार      

दौंड जिल्हा पुणे     

मो: ९९२२५४६२९५

शी जिनपिंग हे चीनचेच नाही तर जगातील शक्तिशाली नेते आहेत. चीनमध्ये त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची हिंमत नाही. शी जिनपिंग यांचा चीनवर एकछत्री अंमल आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे तर ते तहहयात अध्यक्ष आहेत. एकप्रकारे ते चीनचे हुकूमशहाच आहेत. चीनमध्ये त्यांच्या विरोधात किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात तसेच त्यांच्या धोरणाविरोधात बोलण्याची कोणाची ताकद नाही असे मानले जाते मात्र मागील आठवड्यात या समजुतीला छेद देणारी घटना घडली.

संपूर्ण जगातून कोरोना हद्दपार होऊ लागला असला तरी चीनमध्ये मात्र कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. चीनमध्ये दररोज हजारो कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत अर्थात दीडशे कोटी लोकसंख्येच्या मानाने ही संख्या अतिशय नगण्य आहे तरी देखील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमध्ये झिरो कोविड धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार चीनमध्ये एक जरी कोविड रुग्ण आढळला तरी संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करून संपूर्ण शहराची सीमा सील केली जाते. चीनमध्ये सध्या एक दोन नव्हे तर बारा शहरात कोविडने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सरकारने ही बारा शहरे पुन्हा लॉक डाऊन केली आहेत. सततच्या लॉक डाऊनमुळे या बारा शहरातील नागरिक हैराण झाले आहे. शहरात लॉक डाऊन लागू असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाहीत. लॉक डाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवावे लागत आहेत त्यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉक डाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे.

लॉक डाऊनमुळे शाळा कॉलेज बंद आहेत त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे एकूणच लॉक डाऊनमुळे चीनमधील जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे त्यामुळेच शी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण मागे घ्यावे अशी या बारा शहरातील लोकांची मागणी आहे मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जनतेच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत त्यामुळेच या शहरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि ते सरकारच्या या झिरो कोविड धोरणाच्या विरोधात रस्त्यांवर उतरले. या आंदोलनात सर्व गटातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यात महिला आणि तरुण मुलांची संख्या लक्षणिय होती. विशेष म्हणजे या आंदोलनात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या. शी जिनपिंग खुर्ची सोडा, कम्युनिस्ट पार्टी सत्ता सोडा अशा घोषणा आंदोलकांनी या आंदोलनात दिल्या त्यामुळे संपुर्ण जगाचे लक्ष आंदोलनाकडे वळले. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलीस आणि आंदोलक यांची यावेळी मोठी झटापट झाली. हे आंदोलन चिरडून टाका असा आदेशच जिनपिंग यांनी पोलिसांना दिला मात्र आंदोलकांनीही माघार घेतली नाही. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.

चीनमध्ये राष्ट्राध्यक्षांविरोधात आंदोलन करणे हा मोठा गुन्हा मानला जातो त्यामुळेच चीनमध्ये खूप कमी वेळा आंदोलने होतात. यावेळी झालेले हे आंदोलन तब्बल १७ वर्षांनी झाले आहे. २००५ साली सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती तर त्याआधी १९८९ साली चीनच्या शहरातील तियानामेन चौकात आंदोलन करण्यात आले होते. यावरून चीनमध्ये आंदोलन हे किती दुर्मिळ आहे हे आपल्या लक्षात येईल. अर्थात तिथेही छोटे मोठे आंदोलने होतात. नाही असे नाही मात्र ती जगाच्या समोर येत नाहीत. अर्थात कितीही मोठे आंदोलन झाले तरी ते कसे चिरडायचे हे तेथील सरकारला चांगलेच माहीत आहे त्यामुळे तेथील आंदोलने यशस्वी होत नाहीत. आता झालेले कोविड झिरो विरोधातील आंदोलन देखील यशस्वी होईल असे वाटत नाही .

अर्थात हुकूमशहा सत्ताधीशांच्या धोरणाविरोधात रस्त्यांवर उतरून त्यांचा निषेध करणे ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. यासाठीच या आंदोलकांच्या धाडसाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here